नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली 14 जानेवारी ते 20 मार्च या कालावधीत मणिपूर ते मुंबई अशी भारत न्याय यात्रा काढण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर राहुल गांधींची ही यात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पण सध्या भारत न्याय यात्रेचा काँग्रेसला लोकसभा निवडणुकांमध्ये फायदा होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ज्या ठिकाणाहून ही यात्रा निघेल तिथल्या लोकसभेच्या जागा काँग्रेसच्या वाट्याला जातील का? हा देखील प्रश्न सध्या पडलाय. या सर्व प्रश्नांवर सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केले आहे.


 राहुल गांधी  यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यानंतर आता काँग्रेस दुसरी यात्रा काढण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच काँग्रेस भारत न्याय यात्रेला सुरुवात करणार आहे. यावेळी काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेचा प्रवास मणिपूर ते मुंबई असा असेल. या प्रवासात काँग्रेस 6200 किलोमीटरचं अंतर पार करण्याच्या तयारीत आहे.


लोकांनी काय म्हटलं?


2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेचा काँग्रेसला फायदा होईल का? यावर 39 टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले. तर 49  टक्के लोकांनी नाही म्हटले. याशिवाय 12  टक्के लोकांनी यावर आत्ताच काही बोलू शकत नसल्याचे सांगितले.


राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेचा फायदा काँग्रेसला लोकसभा निवडणुकांमध्ये होणार?


हो - 39 टक्के
नाही - 49 टक्के 
सांगता येत नाही - 12 टक्के


कशी असणार 'भारत न्याय यात्रा'?  


काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 14 जानेवारी रोजी मणिपूरमध्ये भारत न्याय यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. अशा प्रकारे हा प्रवास अधिकृतपणे सुरू होईल. ही यात्रा 20 मार्चला मुंबईत संपणार आहे. भारत न्याय यात्रा 14 राज्यांतील 85 जिल्ह्यांतून जाणार आहे. भारत न्याय यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणार आहे.


भारत जोडो यात्रा


यापूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर 2022 ते 30 जानेवारी 2023 पर्यंत कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली होती. ही यात्रा 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 75 जिल्हे आणि 76 लोकसभा मतदारसंघातून गेली. त्यांच्या या दौऱ्याचा कर्नाटक आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदा झाल्याचे मानले जात होते. लोकसभा निवडणुकीत एकीकडे काँग्रेस, टीएमसी, आम आदमी पार्टी, डीएमके आणि जेडीयूसह अनेक पक्षांची विरोधी आघाडी आहे. दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आहे.


हेही वाचा : 


Ayodhya New Airport Name: अयोध्येतील विमानतळाचं नाव ठरलं, 'ही' असणार नवी ओळख, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन