ABP C-Voter Opinion Poll :  छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीचा  (Chhattisgarh Assembly Election) बिगुल वाजला आहे. सोमवारी (9 ऑक्टोबर) निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विधानसभेच्या 90 जागांसाठी राज्यात दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्याचा मोठा भाग हा नक्षल प्रभावित भागात मोडतो.


निवडणुकीपूर्वी सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी ओपिनियन पोल सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून लोकांचा कल समोर आला आहे. काँग्रेसला छत्तीसगडमध्ये आपण केलेल्या कामाच्या आधारे सत्ता कायम राखू असा विश्वास आहे. तर, सरकारविरोधातील वातावरणाचा फायदा मिळणार असल्याचे भाजपला वाटत आहे. 


ओपिनियन पोलचा अंदाज काय?


सी-व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढाई होणार असल्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 45 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपला 44 टक्के मते मिळू शकतात. या दोघांमध्ये सध्या तरी एक टक्क्यांचा फरक आहे. तर, उर्वरित लहान पक्ष, अपक्षांच्या पारड्यात 11 टक्के मतदान पडण्याची शक्यता आहे. 


कोणत्या पक्षाला किती जागा? 


ओपिनियन पोलच्या डेटानुसार,  काँग्रेसला 45 ते 51 जागा मिळू शकतात. तर, भाजपला 39 ते 45 जागा मिळण्याचा अंदाज आहे.   इतर पक्षांच्या खात्यात शून्य ते दोन जागा जाण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण जागा 90 आहेत. बहुमताचा आकडा 46 आहे. छत्तीसगडमधील विद्यमान काँग्रेस सरकारचे नेतृत्व मुख्यमंत्री भूपेश बघेल करत आहेत.


छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका 


छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 13 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि 20 ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. याशिवाय 21 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून 23 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना नावे मागे घेण्याची मुदत असेल. पहिल्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 21 ऑक्टोबरला अधिसूचना जारी करण्यात येईल, 30 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस असून त्यानंतर 31 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. 2 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना नावे मागे घेता येतील. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे, तर मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे.


(Disclaimer : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराममध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी ओपिनियन पोल सर्वेक्षण केले आहे. त्यात सुमारे 90 हजार लोकांशी चर्चा करण्यात आली. हा मतदानपूर्व सर्वेक्षण 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आले असून 8 ऑक्टोबर पर्यंत करण्यात आले. सर्वेक्षणातील त्रुटीचे मार्जिन अधिक उणे 3 ते अधिक उणे 5 टक्के आहे.)