ABP C-Voter Survey : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आता काहीच महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. निवडणुकीचे दिवस जवळ येऊ लागले असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या नेतृत्वात असणाऱ्या 30 हून अधिक पक्षांच्या एनडीए (NDA) आघाडीला विजयाचा विश्वास आहे. तर, दुसरीकडे 28 घटक पक्षांचा समावेश असलेल्या इंडिया आघाडीने (I.N.D.I.A. Alliance) देखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने (ABP C-Voter Survey) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वे केला आहे. 


नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भाजपकडून आपल्या बाजूने वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. राम मंदिराचा मुद्दा हा लोकांच्या आस्था, श्रद्धेशी निगडीत आहे. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. 


यानंतर 14 फेब्रुवारी रोजी अबुधाबीमध्ये BAPS हिंदू मंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदींनाही आमंत्रित करण्यात आले आहे. अलीकडेच काँग्रेस नेते शशी थरूर यांनी 2024 मध्ये भाजप आता आपल्या मूळ अजेंड्याकडे परत येईल आणि नरेंद्र मोदींना हिंदुहृदयसम्राट म्हणून देशासमोर सादर करेल हे स्पष्ट असल्याची टीका केली होती. केंद्रीय मंत्र्यांपासून ते भाजपच्या कार्यकर्त्यांपर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना आणि लाभ देशवासियांसमोर ठेवून मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.


याच दरम्यान, एबीपी न्यूजने जनतेचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. C-Voter ने ABP News साठी एक त्वरीत सर्वे केला आहे. ज्यामध्ये लोकांना त्यांना भेडसावणाऱ्या मुद्याबाबत देखील विचारण्यात आले आहे. या सर्वेत लोकांनी दिलेली उत्तरे महत्त्वाची आहेत. 


महागाईच्या मुद्यावर लोकांनी काय म्हटले?


या सर्वेत लोकांना महागाईचा मुद्दा किती महत्त्वाचा आहे,  असा प्रश्न विचारण्यात आला. यामध्ये 56 टक्के लोकांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा असल्याचे सांगितले होते. तर, 17 टक्के लोकांनी महागाई हा मुद्दाच नसल्याचे म्हटले होते. तर, 6 टक्के लोकांनी काहीच सांगू शकत नाही असे म्हटले. 


देशात महागाईचा मुद्दा किती महत्त्वाचा?


अतिशय महत्त्वाचा - 56 टक्के
काही प्रमाणात महत्त्वाचा - 21 टक्के
कोणताच मुद्दा नाही - 17टक्के
काहीच सांगू शकत नाही - 6 टक्के


बेरोजगारीच्या मुद्यावर लोकांनी काय म्हटले?


सर्वेत बेरोजगारी किती महत्त्वाचा मुद्दा आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 61 टक्के लोकांनी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असल्याचे म्हटले. तर, 19 टक्के लोकांनी बेरोजगारीचा मुद्दा काही प्रमाणात महत्त्वाचा असल्याचे म्हटले. 15 टक्के लोकांनी हा कोणताच मुद्दा नसल्याचे म्हटले. 5 टक्के लोकांनी या मुद्यावर काहीच सांगू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले. 


बेरोजगारीचा मुद्दा किती महत्त्वाचा?


अतिशय महत्त्वाचा - 61 टक्के
काही प्रमाणात महत्त्वाचा - 19 टक्के
कोणताच मुद्दा नाही - 15 टक्के
काहीच सांगू शकत नाही - 5 टक्के



विशेष सूचना : आज 2024 वर्षाचा पहिला दिवस आहे. या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत. सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी देशातील आव्हानांवर एक त्वरीत सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात 2,263 लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. 30 डिसेंबर रोजी सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणातील त्रुटीचे मार्जिन अधिक उणे 3 ते अधिक उणे 5 टक्के आहे.