मुंबई : नर्मदा परिक्रमेसाठी गेलेले महाराष्ट्रातील जवळपास शंभरच्या आसपास भाविक सध्या मध्यप्रदेशातील गोमुख घाट, ओंकारेश्वर, अमरकंठक या ठिकाणी अडकून पडले आहेत. यातील काही भाविक सहा महिन्यांपूर्वी तर काही भाविक दोन महिन्यांपूर्वी नर्मदा परिक्रमेसाठी घरातून बाहेर पडले होते. यामध्ये 30 ते 70 वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे.


सध्या त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्हांला महाराष्ट्रात आणण्यासाठी विनंती केली आहे. नर्मदा परिक्रमा हे एक धार्मिक व्रत असून दरवर्षी नर्मदा परीक्रमेची सुरुवात परंपरेनुसार चातुर्मास संपल्यावर म्हणजे प्रबोधिनी एकादशी झाल्यावर होते. नर्मदा नदीला पायी प्रदक्षिणा घालण्यासाठी देशभरातील विविध भागामधून भाविक या परिक्रमेसाठी नियोजन करतात. या परिक्रमेला गेलेल्या भाविकांमध्ये मुंबई, डोंबिवली, कर्जत, पुणे, सातारा, नगर आणि नाशिक येथील भाविकांचा समावेश आहे. सध्या नर्मदा नदी शेजारी असणारे आश्रम आणि निवासस्थान येथे या भाविकांना कोरोनाच्या भीतीने घेण्यास नकार देण्यात येतं आहे. तसेच जे भाविक रस्त्याने चालत आहेत. त्यांना आसपासच्या गावातील नागरिक गावात राहण्यासाठी तसेच खाण्यासाठी येऊ देत नसल्याचं निदर्शनास आलं आहे.


Lockdown 2 | नर्मदा परिक्रमेसाठी गेलेले जवळपास 100 भाविक मध्यप्रदेशात अडकले


याबाबत बोलताना ज्ञानेश्वर गायकवाड म्हणाले की, मी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील रहिवाशी आहे. मी जाधववाडी येथील सुभाषमहाराज घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली 6 फेब्रुवारी 2020 ला सुरुवात केली. सुरुवातीला मी आणि माझे सहकारी रेल्वेने अंकलेश्वरला आलो. त्यानंतर आम्ही आमच्या नर्मदा परिक्रमेला सुरुवात केली. अंकलेश्वर येथुन आम्ही समुद्र पार करून अमरकंठकला येऊन पोहोचलो आणि कोरोना महामारी मुळे संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. याचा परिणाम आम्हांला खाणे आणि राहणे याच्या अडचणी येऊ लागल्या. नर्मदा किनारी असणाऱ्या जवळपास सर्वच आश्रम, गाव आणि मंदिरात आम्हांला प्रवेश नाकारण्यात आला. एकीकडे खाण्याचे हाल तर दूसरीकडे राहण्याचे देखील हाल होऊ लागले आहेत. त्यामुळे आम्ही 'एबीपी माझा'च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करत आहोत की आम्हांला लवकरात लवकर महाराष्ट्रात आणण्यासाठी मदत करावी.


सध्या नर्मदा परिक्रमेसाठी आलेल्या पुण्यातील काही भाविकांना मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या स्वगृही परतण्यास मदत केली आहे. याच प्रमाणे आमची देखील व्यवस्था व्हावी. सध्या अनेक भाविक रस्त्याने नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी चालत आहेत.


संबंधित बातम्या :