नवी दिल्ली : नोएडामधील आरुषी हत्याकांड प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाने तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता केली आहे. गाझियाबादमधील डासना तुरुंगात असलेल्या राजेश तलवार आणि नुपूर तलवार यांची आज सुटका होईल, असा अंदाज लावला जात होता. मात्र तलवार दाम्पत्याला आजही तुरुंगातच रहावं लागण्याची शक्यता आहे.

हायकोर्टाच्या निर्णयाची अधिकृत प्रत अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे वेळ लागत आहे. आज सायंकाळपर्यंत प्रत मिळाली नाही, तर सोमवारपर्यंत सुटका शक्य नाही. कारण उद्या शनिवार आणि परवा रविवारमुळे कोर्ट बंद असेल. त्यामुळे रविवारीच प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल, अशी माहिती तलवार दाम्पत्याच्या वकिलाने एबीपी न्यूजशी बोलताना दिली.

अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय

सबळ पुराव्याअभावी हायकोर्टाने आरुषी-मेहराज खून प्रकरणातून तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता केली. सीबीआयच्या न्यायालयाने तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. घटना घडली तेव्हा घरात राजेश आणि नुपूर तलवार दोघेच होते, त्याचा अर्थ असा होत नाही, की हत्या त्यांनीच केली. त्यासाठी काहीही ठोस पुरावा नाही, असं म्हणत कोर्टाने तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता केली.

काय आहे नेमकं प्रकरण?

2008 साली आरुषी हत्याकांडानं संपूर्ण देश हादरुन गेला होता. 16 मे 2008 या दिवशी नोएडातील जलवायू विहार परिसरातून 14 वर्षीय आरुषीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला होता. त्याच्याच पुढच्या दिवशी छतावरुन तलावर कुटुंबीयातील नोकर हेमराज याचाही मृतदेह सापडला होता.

या दुहेरी हत्येप्रकरणी पोलिसांनी आरुषिचे वडील राजेश तलवार यांना अटक केली होती. 29 मे 2008 साली तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं. त्यानंतर सीबीआयनं चौकशी करुन तलवार दाम्पत्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

या खटल्यातील सर्व सुनावणीनंतर कोर्टानं 26 नोव्हेंबर 2013 साली नुपूर आणि राजेश तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या शिक्षेविरुद्ध तलवार दाम्पत्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.

संबंधित बातम्या :

अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानंतर तलवार दाम्पत्य भावूक


आरुषी हत्याकांडातून तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता