भोपाळ : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतीपासून दिलासा देण्यासाठी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातनंतर आता मध्य प्रदेश सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलवरील 3 टक्के आणि डिझेलवरील 5 टक्के व्हॅट एमपी सरकारने कमी केला आहे.


राज्यातही पेट्रोल आणि डिझेल स्वस्त

केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. पेट्रोल 2, तर डिझेल 1 रुपयांनी स्वस्त झालं आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

केंद्र सरकारचं आवाहन

देशात पेट्रोलचे दर 80 रुपये प्रती लिटरच्या पुढे गेल्यानंतर सरकारवर चौफेर टीका झाली. या टीकेनंतर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी 2 रुपयांनी कमी केली. त्यानंतर केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून व्हॅट कमी करण्याचं आवाहन केलं होतं.

गुजरातमध्ये पेट्रोल-डिझेल जवळपास 3 रुपयांनी स्वस्त!

केंद्र सरकारच्या सूचनेनंतर महाराष्ट्रापाठोपाठ गुजरात सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात केली. गुजरात सरकारने व्हॅटमध्ये 4 टक्क्यांनी कपात केल्यामुळे पेट्रोल 2.93 रुपये, तर डिझेल 2.72 रुपयांनी स्वस्त झालं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी याबाबत घोषणा केली.

हिमाचल प्रदेश सरकारनेही व्हॅट घटवला

हिमाचल प्रदेश सरकारनेही मंत्रिमंडळ बैठकीनंतर व्हॅटमध्ये एका टक्क्याने कपात केली. मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी याबाबत माहिती दिली.