नवी दिल्ली: आम आदमी पक्षाने आज राज्यसभेच्या तीन जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह, नारायण दास गुप्ता आणि सुशील गुप्ता यांना आपने उमेदवारी दिली.


या उमेदवारीमुळे कुमार विश्वास यांचा पत्ता कट झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कुमार विश्वास यांच्या उमेदवारीची चर्चा होती.

पत्ता कट झाल्यामुळे कुमार विश्वास यांनी आपलं नाराजी जाहीर केली. त्यांनी सोशल मीडिया फेसबुकवर त्याबाबत पोस्ट लिहिली.

या पोस्टमध्ये त्यांनी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.

गेल्या दीड वर्षांपासून पक्षात अनेक विषयांबाबत मत-मतांतरं झाली. मी सत्य मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचं बक्षीस मला दंड स्वरुपात मिळालं. त्यासाठी मी स्वत:चाच आभारी आहे, असं कुमार विश्वास म्हणाले.

हा नैतिक रुपाने कवीचा, एक मित्राचा, एक खऱ्या आंदोलनकाचा आणि क्रातिकारकाचा विजय आहे, असंही विश्वास यांनी नमूद केलं.

मी  गेल्या 40 वर्षांपासून मनिष सिसोदियांसोबत, 12 वर्ष अरविंद केजरीवालांसोबत काम करतोय. 5 वर्षांपासून आपच्या प्रत्येक आमदारासांठी रॅली, ट्विट, मीडियाच्या माध्यमातून प्रचार करतोय. मात्र आज महान क्रांतिकारक सुशील गुप्ता यांना राज्यसभेत पाठवण्यात येत आहे. त्यासाठी केजरीवाल यांचं अभिनंदन. त्यांनी ‘शानदार’ नियुक्ती केली आहे, असा टोमणा कुमार विश्वास यांनी लगावला.

यावेळी त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतील किस्सा सांगितला.

काही महिन्यांपूर्वी 22 जणांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी मला बोलवलं होतं. त्यावेळी केजरीवाल म्हणाले होते, तुला मारणार पण शहीद होऊ देणार नाही. त्यामुळे मी आता त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं हौतात्म्य स्वीकार करतो. पण युद्धाचे काही नियम असतात, त्यानुसार शहिदांचे मृतदेहाची विटंबना करु नका.