मुंबई : अभिनेता आमीर खानने देखील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर घातलेल्या बंदीचं स्वागत केलं आहे. भविष्यात देशाला मोठा फायदा होणार असेल, तर आता आपण थोडी फार कळ सोसली पाहिजे, असं मत आमीर खानने व्यक्त केले. दंगल चित्रपटाच्या म्युझिक लाँचिंगच्या कार्यक्रमात आमीर बोलत होता.
नोटा बंद करण्याचा मोदींचा निर्णय
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरोधात ठोस पाऊल उचलत, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. नोटा बदलण्यासाठी 30 डिंसेंबरची मुदत दिली आहे.
बँकांबाहेर लोकांच्या रांगा
नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर लोकांनी नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये एकच गर्दी केली. शिवाय, सामान्यांचा दैनंदिन जीवनक्रमही बिघडला. अनेकांना रोजच्या वस्तू खरेदी करणंही अवघड झालं. मात्र, पंतप्रधान मोदींचा निर्णय भविष्यात देशासाठी चांगला आहे, असे म्हणत आमीरने लोकांना सकारात्मक प्रतिसाद देण्याचं आवाहन केलं आहे.