Arvind Kejriwal Mission 2024 : पुढील लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप जवळपास 2 वर्षे शिल्लक आहेत. परंतू, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. त्यात दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाचाही समावेश आहे. पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानं आपचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. खुद्द अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे लक्ष आता 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर आहे. केजरीवाल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) टक्कर देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही बोलले जात आहे. त्यासाठी पक्षाने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु केली आहे.


राष्ट्रीय राजकारणात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आता आपल्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. कारण आम आदमी पार्ची आता प्रत्येक राज्यात निवडणूक लढवत आहे. कोणत्याही राजकीय पक्षांशी युती न करता आप निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. यातून 'आप' हा एक पर्याय असू शकतो, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आगामी हिमाचल प्रदेश आणि गुजरात निवडणुकांसाठी देखील आपने तयारी सुरु केली आहे. म्हणजेच या सगळ्या विधानसभा निवडणुकांना शिडी बनवून केजरीवाल 2024 चा डोंगर चढू पाहत असल्याचे बोलले जात आहे.


राष्ट्रीय अभियान राबवण्यात येणार 


2024 च्या निवडणुकीकडे पाहता आता आम आदमी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर स्वतःचे स्थान भक्कम करायची आहे. त्यामुळेच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हे आज (17 ऑगस्ट) दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर मोठ्या राष्ट्रीय अभियानाची सुरुवात करणार आहेत. पक्षाची ही मोहीम 'मेक इंडिया नंबर 1' या थीमवर सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्ष 2024 च्या निवडणुकीत अतिशय गांभीर्याने उतरणार असून, यावेळी राष्ट्रीय राजकारणात स्वत:साठी मोठे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही बोलले जात आहे.


'मेक इंडिया नंबर 1' ही थीम सुरू करण्याच्या तयारीत असलेले अरविंद केजरीवाल काही काळापासून सतत आपल्या भाषणांमध्ये त्याचा समावेश करत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणात असेही म्हटले होते की आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत, पण तरीही आपण खूप मागे आहोत. असे अनेक देश आहेत ज्यांनी फार कमी वेळात खूप यश मिळवले असल्याचे केजरीवाल म्हणाले होते.


महत्त्वाच्या बातम्या: