Atal Bihari Vajpayee : ग्वाल्हेरचे सुप्रसिद्ध साहित्यिक जगदीश तोमर (Literary Jagdish Tomar) यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या आठवणींना उजाळा दिला. मंगळवारी अटलबिहारी वाजपेयी यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमात अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल बोलताना जगदीश तोमर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्राच्या उभारणीत तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिस्तप्रिय तरुणच देशाला नवी दिशा देऊ शकतात, अशी कल्पना त्यांनी मांडल्याचे तोमर यांनी सांगितले.


अटलबिहारी वाजपेयींचे सहकारी जगदीश तोमर यांनी जागवल्या आठवणी 


साहित्यिक जगदीश तोमर हे अटलबिहारी वाजपेयी यांचे सहकारी होते. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमात वाजपेयी यांच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. एकदा तरुणांनी विविध मागण्यासांठी रॅली काढली होती. यामध्ये शाळेत, महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी हजेरी लावू नये, फी घेऊ नये, परीक्षा नसाव्यात, असे फलक तरुणांच्या हातात होते. यामध्ये वाजपेयी यांच्यासह जगदीश तोमर हे देखील सहभागी होते.  यावेळी वाजपेयींनी पुढे काय करायचे आहे, तोमर यांनी विचारले. यावेळी तोमर म्हणाले की, मी अजून काही विचार केलेला नाही. अजून दिशा ठरवलेली नाही. त्यावेळी तोमर एमएच्या प्रथम वर्षाला होते. यावेळी देशासाठीही थोडा वेळ काढा. तुम्हीच देशाला दिशा देऊ शकता, असे वाजपेयी म्हणाले होते अशी आठवण तोमर यांनी सांगितली. 


1957 च्या लोकसभा निवडणुकीची आठवण


जगदीश तोमर यांनी वाजपेयींचे अनेक रंजक किस्से यावेळी सांगितले. मी त्यावेळी महाराणी लक्ष्मीबाई कला आणि वाणिज्य महाविद्यालय ग्वाल्हेरमध्ये शिकत होतो. अटलजी हे याच महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. त्यामुळं लोकसभेची पहिली निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना सन्मानासाठी या महाविद्यालयात आमंत्रित करण्यात आले होते. सन्मान सोहळ्यात आम्ही अटलजींशी संवाद साधला. यावेली ते म्हणाले की, मला एकाच निवडणुकीत तीन अनुभव आले. पक्षाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी एकाच वेळी तीन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. एका ठिकाणी त्यांचे डिजॉजीट जप्त झाले होते. दुसऱ्या एका लोकसभा मतदारसंघात ते हरले तर तिसऱ्या मतदारसंघात ते विजयी झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तोमर यांनी सांगितले की, 1957 च्या लोकसभा निवडणुकीत अटलजींनी मथुरा, लखनौ आणि बलरामपूरमधून निवडणूक लढवली होती. ते मथुरेसह लखनौमध्ये पराभूत झाले होते. तर बलरामपूरमधून निवडणूक जिंकले होते.


कांती मिश्रा यांच्याकडूनही अटलजींच्या आठवणींना उजाळा 


अटलबिहारी वाजपेयी यांचे मोठे बंधू सदा बिहारी वाजपेयी यांची मुलगी कांती मिश्रा यांनी देखील अटलजींच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्या देखील भावूक झाल्या. ग्वाल्हेरच्या कमलसिंह बागेत अटलजींच्या वडिलोपार्जित घरात राहणाऱ्या कांती मिश्रा यांनी सांगितले की, 2004 मध्ये  चाचाजी (अटलबिहारी वाजपेयी) त्यावेळी पंतप्रधान होते. ते पंतप्रधान असताना माझा मुलगा पंकज मिश्रा याचे 4 मे रोजी लग्न होते. अटलजी खूप व्यस्त होते, त्यामुळं ते लग्न समारंभाला येऊ शकणार नाहीत, अशी चर्चा नातेवाईकांमध्ये होती. त्यांचे व्यस्त वेळापत्रक पाहता आम्हालाही त्यांच्या येण्याची फारशी आशा नव्हती. दरम्यान, एके दिवशी पंतप्रधान कार्यालयातून अटलजी ग्वाल्हेरला येत असल्याचा फोन आला. त्यावेळी आमच्या आनंदाला पारावर उरला नसल्याचे कांती मिश्रा यांनी सांगितले. यावेळी आम्ही सगळ्यांनी  अटलजींचे खूप आदरातिथ्य केले. त्यावेळी अटलजींनी मला एक साडी आणि त्याचबरोबर 10 हजार रुपये भेट म्हणून दिले होते. ती साडी आजही जपून ठेवल्याचे कांती मिश्रा यांनी सांगितले. अशा अटलबिहारी वाजपेयी यांच्या विविध आठवणींना यावेळी कांती मिश्रा यांनी उजाळा दिला. अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 ला मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला होता. तर 16 ऑगस्ट 2018 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


महत्त्वाच्या बातम्या: