मुंबई : रेल्वे तिकीट ऑनलाईन आरक्षित करण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. एकगठ्ठा तिकीट खरेदी आणि तिकीट विक्रीतील दलाली संपुष्टात आणण्यासाठी रेल्वे हा नवा पर्याय स्वीकारण्याच्या तयारीत आहे.

आधारकार्ड नसल्यास यापुढे ऑनलाईन तिकीट खरेदी करता येणार नाही. तिकीट विक्रीत होणाऱ्या दलालीला आळा घालणं हा रेल्वेचा आधारकार्डसक्ती मागील खरा हेतू आहे. तसेच रेल्वे तिकिटांवर सवलत मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना येत्या 1 एप्रिलपासून आपला आधार क्रमांक द्यावा लागणार आहे.

तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवली जाणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर लॉगइन करण्यासाठी आधार क्रमांकाची आवश्यकता भासणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासन सॉफ्टवेअर तयार करत असल्याची माहिती आहे.