नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या वतीनं आधार कार्डाचा वापर सर्व सरकारी योजनांसाठी करण्यात येत असून, याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेसाठीही विद्यार्थांना आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलं आहे.

याबाबत केंद्र सरकारनं एक अध्यादेश प्रसिद्ध केला असून, यात ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही, त्यांना 30 जूनपर्यंत आधार कार्डसाठी अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आधार कार्ड मिळेपर्यंत ही शिष्यवृत्ती सुरु राहण्यासाठी आधार कार्डासाठी अर्ज केलेल्या नोंदणीची स्लिप देण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन, याशिवाय इतर कोणतंही ओळख पत्र सादर करावं लागणार आहे.

सध्या आधार कार्डचा वापर सर्वच शासकीय कामांसाठी बंधनकारक करण्यात येत असून, कालच पीएफसाठीही आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलं होतं. यासाठी सरकारकडून 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याशिवाय, मुलाचा जन्म दाखला तयार करतानाच, आधार कार्ड तयार करुन घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

या शिवाय सरकारनं रेशन दुकानांमध्येही आधार कार्ड जमा करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीनंतर आधार कार्डाशिवाय रेशन दुकानांमधून धान्य मिळणार नाही. त्यामुळे सध्या सर्वच शासकीय कामांसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे आधार कार्ड हीच भविष्यात भारतीयांची ओळख बनणार आहे.