चेन्नई : तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री ई पलानीसामी यांनी प्रचंड गदारोळात अखेर विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. पलानीसामी यांच्या बाजूने 122 आमदारांनी मतदान केलं. तर 11 आमदारांनी पलानीसामींच्या विरोधात मत दिलं.


ई पलानीसामी यांनी गुरुवारीच तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. नव्या सरकारला सदनात बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र एआयएडीएमकेच्या महासचिव शशिकला यांचे निकटवर्तीय असणाऱ्या पलानीसामी यांनी दोनच दिवसात बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय घेतला होता.

122 आमदारांचं बाजूने मतदान

तामिळनाडू विधानसभेत एआयएडीएमकेचे 134 आमदार आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी 118 आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता. आमदार आणि राज्याचे माजी पोलिस महासंचालक आर नटराज यांनी विरोधात जाण्याची भूमिका घेतल्यानंतरही पलानीसामींनी आपल्याकडे बहुमतापेक्षा 5 आमदार जास्त (123) असल्याचा दावा केला होता. त्यापैकी 122 आमदारांनी त्यांच्या बाजूने मतदान केलं.

विधानसभेत गदारोळ

विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावादरम्यान मोठा राडा झाला. डीएमके, एआयएडीएमके (पन्नीरसेल्वम गट) आणि इंडियन यूनियन मुस्लीम लीगच्या आमदारांनी विश्वासदर्शक ठरावासाठी गुप्त मतदानाची मागणी केली. मात्र विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला.

यानंतर आमदारांनी विधानसभेत घोषणाबाजी करत अध्यक्षांसमोर खुर्च्यांची तोडफोड केली. कागदं फाडून फेकण्यात आले. डीएमकेच्या काही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्कीही केली. त्यानंतर गोंधळ एवढा वाढला की अध्यक्षांना विधानसभेतून बाहेर सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मार्शल्सची मदत घ्यावी लागली.

इतकंच नाही तर डीएमकेच्या एका आमदाराने विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून घोषणाबाजी केली.

संबंधित बातम्या :


पलानीसामी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रं, दोन महिन्यातील तिसरे मुख्यमंत्री

तामिळनाडू विधानसभेत पलानीसामींसमोर बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान

पलानीसामी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रं, दोन महिन्यातील तिसरे मुख्यमंत्री

जयललितांच्या समाधीवर शशिकलांनी रागाने हात आपटले, कारण…

आत्मसमर्पणाआधी शशिकला अम्मांच्या समाधी स्थळावर

पनीरसेल्वम यांची हकालपट्टी,पलनीसामी विधीमंडळ नेतेपदी

शशिकलांना मोठा धक्का, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी 4 वर्षांचा तुरुंगवास