नवी दिल्ली: 1 जुलैपासून तुम्हाला आयटी रिटर्न भरायचं असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलं आहे. सीबीडीटी म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सनं आधारसक्तीसंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान, काल सुप्रीम कोर्टानं आयटी रिटर्नसाठी तुर्तास आधार कार्ड सक्तीचं नाही असा निर्णय दिला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं विश्लेषण करताना कर विभागानं काही महत्त्वाच्या सुचना प्रसिद्ध केल्या आहेत.
ज्यात 1 जुलैपासून आयटी रिटर्न आणि पॅन कार्डसाठी आधारकार्ड सक्तीचं असणार आहे. दरम्यान, ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही त्यांच पॅन कार्ड रद्द करण्यात येणार नाही.
कोर्टाच्या निर्णयानंतर आयकर विभागाचं नेमकं विश्लेषण काय?
1. जुलैपासून आयकर रिटर्न आणि पॅनकार्डसाठी आधारकार्ड आवश्यक आहे. ज्यांनी आधारकार्डसाठी अर्ज केला आहे त्यांना आधारकार्डच्या इनरॉलमेंट आयडी नमूद करावा लागेल.
2. ज्यांना 1 जुलैपर्यंत आधारकार्ड मिळणार असेल आणि ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे त्या सर्वांना आयकर विभागाला आपला आधार नंबर देणं आवश्यक आहे. कारण की, त्यानंतरच तुमचा आधार पॅनकार्डशी लिंक होईल.
3. दरम्यान, ज्यांच्याकडे अद्याप आधारकार्ड नाही त्यांचं पॅनकार्ड रद्द होणार नाही.
फक्त 5 कोटी लोकंच भरतात आयकर:
सरकारचा दावा आहे की, देशात आतापर्यंत 113 कोटी लोकांना आधारकार्डचं वाटप करण्यात आलं आहे. तर जवळजवळ 29 कोटी लोकांकडे पॅन कार्ड आहे. तरीसुद्धा फक्त 5 कोटी लोकंच आयकर नियमितपणे भरतात.
आयकर विभागाचं म्हणणं आहे की, पॅनकार्डशी आधारकार्ड लिंक करण्याची प्रक्रिया फारच सोपी आहे. आयकर विभागाची वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in वर जाऊन पॅन आणि आधारची माहिती द्यायची. त्यानंतर तुमचं पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक होईल.