नवी दिल्ली : शरद पवार हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रेसमध्ये नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं. तसेच विरोधकांनी एकजूट दाखवून उमेदवार दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस त्याला पाठिंबा देईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर एबीपी माझाशी बोलताना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ''शरद पवार आणि आम्हा सर्वांनाही माहिती आहे की, या निवडणुकीत एनडीएचाच उमेदवार विजयी होणार आहे. त्यामुळे शरद पवार या निवडणुकीत उभे राहणार नाहीत. पण विरोधकांनी एकजूट करुन, सक्षम उमेदवार दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस त्याला समर्थन देईल,'' असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी काँग्रेसवरही चांगलंच तोंडसुख घेतलं, ''काँग्रेसनं सेक्यूलॅरिझमच्या नावाखाली इतर पक्षांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात काँग्रेसची भूमिका वेगळी आहे. प्रत्येक बैठकीवेळी काँग्रेसकडून धर्मनिरपेक्षतेसंदर्भात इतर पक्षांना सूचना देण्यात येतात. पण स्वत: कडून याचं पालन होत नाही. तर मग राष्ट्रवादी काँग्रेसनंच या सूचना पाळण्याचा ठेका घेतला आहे का?'' असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.  देशातील राजकारण सध्या वाईट वळणार असल्याची चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

पण दुसरीकडे, प्रफुल्ल पटेल यांनी याच कार्यक्रमात बोलताना भाजपपेक्षा काँग्रेसवरच जास्त टीका केली. ''सेक्यूलर विचार हा आमचा अजेंडा आहे, पण त्यासाठी मित्रपक्षांनीही त्यांची जबाबदारी ओळखायला हवी. काँग्रेसला बहुमत असूनही गोवा, मणिपूरमधे त्यांना सरकार बनवता आलं नाही, तर दुसरीकडे मेघालय आणि गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत आहे.'' अंसं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

देशातील राजकारण वाईट वळणावर : शरद पवार