भोपाळ (मध्य प्रदेश) : भोपाळ सेंट्रल जेलमधून पळालेल्या 'सिमी'च्या आठही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. भोपाळ सेंट्रल जेलपासून 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या अचारपुरा गावात मध्य प्रदेश पोलिसांनी धडक कारवाई करत दहशतवाद्यांना ठार केले.


अचारपुरा गावात पोलिसांनी जेलमधून पळालेल्या सिमीच्या आठही दहशतवाद्यांना घेरलं. त्यानंतर दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र, शरण येण्यास नकार दिल्याने पोलिसांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.

सिमीचे 8 दहशतवादी रात्री साडेतीनच्या सुमारास भोपाळ सेंट्रल जेलमधून पळाले होते. यावेळी त्यांनी जेलमधील सुरक्षारक्षकाचा गळा चिरुन त्याची हत्या केली आणि चादरीची रस्सी बनवून जेलची भिंत ओलांडली होती.

दहशतवादी फरार झाल्याने भोपाळ सेंट्रल जेलच्या अधीक्षकांसह तिघांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर शहरभर हाय अलर्ट जारी करुन, पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. पळालेल्या दहशतवाद्यांचा तपास अत्यंत वेगाने सुरु करण्यात आला होता.

सिमी : स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया

सिमी (Students Islamic Movement of India) ही दहशतवादी संघटना आहे. 25 एप्रिल 1977 रोजी अलिगढमध्ये ‘सिमी’ची स्थापना झाली. 2001 साली सरकारने या संघटनेवर बंदी आणली. आतापर्यंत मध्यप्रदेशातून सिमीचे सर्वात जास्त दहशतवादी अटक करण्यात आले आहेत.

संबंधित बातमी : भोपाळ सेंट्रल जेलमधून सिमीच्या 8 दहशतवाद्यांचं पलायन