लखनौः बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कुटुंबाला धमक्यांमुळे उत्तर प्रदेश सोडण्याची वेळ आली आहे. जबरदस्ती खंडणी वसुलीसाठी नवाजुद्दीनच्या कुटुंबावर दबाव टाकण्यात येत असून त्याच्या भावावर हल्लाही करण्यात आला, अशी तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे.

या दहशतीमुळे नवाजुद्दीनचं कुटुंब उत्तर प्रदेश सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थायिक होण्याची शक्यता आहे. नवाजुद्दीनच्या कुटुंबाला एक कोटींची खंडणी मागण्यासाठी वारंवार धमक्या देण्यात येत आहेत.

काय आहे प्रकरण?

नवाजुद्दीनचा भाऊ मिनाजुद्दीन याला फोनवरुन खंडणीसाठी धमक्या येत आहेत. त्याच्यावर अज्ञातांनी हल्ला देखील केला, असा दावा मिनाजुद्दीनने केला आहे. मिनाजुद्दीनने हुंड्यासाठी बायकोचा छळ केला, असा आरोप आहे. त्यामुळे मिनाजुद्दीनच्या कुटुंबाकडून याचा बदला घेतला जात असल्याची पोलिसांना शंका आहे.

मिनाजुद्दीनची पत्नी आफरीनच्या कुटुंबाकडून हे धमकीचे फोन येत असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. हुंडा मागितल्यामुळे या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा मिनाजुद्दीनने केला आहे. त्यामुळे आपण आता उत्तराखंडमध्ये शिफ्ट होणार असल्याचं मिनाजुद्दीनने तक्रारीत म्हटलंय.