Assam Floods : अखंड सुरु असलेल्या पावसामुळे आसाममधील जनजिवन विस्कळीत झालेय. तब्बल 32 जिल्ह्यांना पावसाचा फटका बसलाय. आतापर्यंत पावसामुळे आणि दरड कोसळून तब्बल 73 जणांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण बेपत्ता आहेत. नमागरिकांप्रमाणे जनावरांचेही प्रचंड हाल होत आहेत. आसाममधील 42 लाख लोकांना या पूरस्थिताचा फटका बसलाय. बचावकार्य जोरात सुरु आहे. पण मदतीसाठी आलेल्यांनाही पूराचा फटका बसत आहे. बचावकार्यादरम्यान चार पोलीस वाहून गेले आहेत. यामधील एकाचा मृतदेह मिळालाय तर अन्य तीन पोलीस बेपत्ता आहेत. 32 जिल्हे या पुराच्या पाण्यामुळं प्रभावीत झाले आहेत. पुरामुळं शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यानं, नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणं देखील कठीण झाल आहे. दरम्यान,  भारतीय लष्कराकडून सातत्याने मदत आणि बचावकार्य सुरु आहे.




सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पाच हजारांपेक्षा जास्त गावे पाण्याखाली गेली आहेत. घरामध्ये पाणी गेल्यामुळे संसार उघड्यावर आलाय. नागरिकांची तारांबळ उडाली असून भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकजण रस्त्यावर आले आहेत. बजाली, बक्सा, बारपेटा, बिस्वनाथ, कचरा, दारंग, धेमाजी, भुबरी, कार्बी, कोकराजसह अनेक जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. फक्त नागरिकचं नाही, तर जनावरे आणि पक्षांचेही हाल होत आहेत. लष्कराच्या जवानांचे बचाव आणि मदतकार्य सुरुच आहे. बचाव मोहिमेसोबतच लष्कराचे जवान हजारो लोकांना मदत करण्यासाठी मदत छावण्यांमध्ये आवश्यक वस्तूंचा वेळेवर पुरवठा सुनिश्चित करत आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढत आहेत.






संततधार पावसामुळे घरात तर पाणी गेलेच... त्याशिवाय रस्तेही खचले आहेत. वाहने पाण्याखाली गेली आहेत. मदत शिबारात अनेकांनी आश्रय घेतलाय. लोक रस्त्यावरच जेवण करत आहेत.  नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफ पथक कसोशीने प्रयत्न करतेय. अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येथील पूरस्थितीचा सातत्याने आढावा घेत आहेत. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे विविध ठिकाणच्या मदत शिबिरांत आश्रयास आलेल्या पूरग्रस्तांची भेट घेत आहेत. तेथील परिस्थितीवर मुख्यमंत्री स्वत: बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मोदींनी मुख्यमंत्र्यांना फोन करून पूरस्थितीची माहिती घेतली. केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही पंतप्रधानांनी दिले आहे.






आसाममध्ये मागील सहा दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झालेय, अशी माहिती एएसडीएमएने दिली आहे.  आसाम राज्यातील जनजिवन विस्कळीत झालेय. सगळीकडे भयावह परिस्थिती आहे.  सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांनी रौद्ररुप धारण केलेय. त्यामुळे शहरात कंबरेइतके पाणी साचलेय.