PM Modi : इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुरडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) महागाईमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत एक भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्राची चर्चा सध्या सोशल मीडीयावर होताना दिसत आहे. 


"मोदीजी तुम्ही खूप महागाई केली आहे.."
उत्तर प्रदेशातील एका 6 वर्षाच्या चिमुरडी क्रितीने लिहिले, 'पंतप्रधान जी, माझे नाव कृती दुबे आहे. मी इयत्ता पहिलीत शिकते. मोदीजी तुम्ही खूप महागाई केली आहे. पेन्सिल आणि रबरही महाग केले आहे. आणि मॅगीच्या किंमतीही वाढल्या आहेत. आता पेन्सिल मागितली म्हणून आई मला मारते. मी काय करू? मुलं माझी पेन्सिल चोरतात.'  क्रिती दुबेचे हे पत्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले.


चिमुरडीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल


हिंदीत लिहिलेले हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मुलीचे वडील विशाल दुबे, जे वकील आहेत, म्हणाले, "ही माझ्या मुलीची 'मन की बात' आहे. नुकतीच तिच्या आईने शाळेत पेन्सिल हरवल्याबद्दल तिला मारले तेव्हा तिला राग आला."


मुलीला शक्य ती मदत करण्यास तयार
पोलीस अशोक कुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, या चिमुरडीच्या पत्राबद्दल त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून कळले. "मी मुलीला शक्य ती मदत करण्यास तयार आहे आणि तिचे पत्र संबंधित अधिकार्‍यांपर्यंत पोहोचावे यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन," असे ते म्हणाले.