अहमदाबाद : गुजरातमध्ये काँग्रेसमधील आमदारांना फोडून गांधी घराण्याचे निकटवर्तीय अहमद पटेल यांचा राज्यसभेच्या निवडणुकीत पराभव करण्याचा डाव भाजपनं आखला आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत काँग्रेसच्या 5 आमदारांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.


अहमद पटेलांचा पराभव करुन गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचं खच्चीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या एकूण पाच आमदारांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे.


काँग्रेसचे आमदार मानसिंह चौहान आणि छनाभाई चौधरी या दोघांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. तर काल बलवंतसिह राजपूत, तेजश्री पटेल आणि प्रल्हाद पटेल या तिघांनी काँग्रेसला रामराम केला होता.


राज्यसभेच्या 4 जागांसाठी गुजरातमध्ये येत्या 8 ऑगस्टला निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शाह, तसंच स्मृती इराणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि गांधी घराण्याचे निकटवर्तीय अहमद पटेल यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.


 त्यातच काँग्रेसच्या 6 आमदारांच्या राजीनामा सत्राला भाजपचं षडयंत्र असल्याचं सांगून, भाजपकडून आमदारांना 10 कोटीची ऑफर दिल्याचा आरोप होत आहे. काँग्रेस आमदार पूना गमित यांनी याबाबतचे आरोप केले आहेत.


यापूर्वी गुजरात विधानसभेत काँग्रेसचे एकूण 57 आमदार होते. पण त्यातील सहा जणांनी राजीनामा दिल्यानं हा आकडा 51 वर आला आहे. राज्यसभा निवडणुकीत अहमद पटेल यांच्या विजयासाठी 46 मतांची गरज असून, अहमद पटेल यांच्या विजयात अद्याप कोणत्याही अडचणी नाही. पण तरीही आमदारांना फुटण्याची भीती काँग्रेसला वाटत असल्याने, काँग्रेसनं आपल्या 14 आमदारांना बंगळुरुला रवाना केलं आहे.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून गुजरात काँग्रेसच्या 22 आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे हा आकडा 35 वर आल्यास अहमद पटेल यांच्या विजयाची वाट अवघड होणार आहे.