Prime Minister Narendra Modi : तंत्रज्ञानाच्या नव्या युगात भारत  प्रवेश करत आहे. एक ऑक्टोबरपासून (शनिवार, 1 ऑक्टोबर 2022) भारतात सुपरफास्ट इंटरनेट सेवा सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानी दिल्लीमध्ये 5G सेवेचा शुभारंभ होणार आहे. 


शनिवारी, एक ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील प्रगती मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी 5G सेवेचा शुभारंभ करतील. 5G तंत्रज्ञानामार्फत चांगले कव्हरेज, जास्त डेटा, कमी विलंब आणि अत्यंत विश्वासार्ह संवाद सुविधा प्राप्त होणार आहेत. 5G तंत्रज्ञान ऊर्जा सक्षमता, स्पेक्ट्रम सक्षमता आणि नेटवर्क सक्षमताही वाढवेल.






गेल्या काही दिवसांपासून देशभरात 5G ची चर्चा होती. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशात लवकरच  5G सेवा सुरु होणार असल्याचं वारंवार सांगितलं होतं. तसेच दोन वर्षांमध्ये देशभरात 5G चं जाळं उभारण्याचं सरकारचं लक्ष्य असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. 






3G आणि 4G पेक्षा 5G मध्ये वेगळं काय?
5 जी पाचव्या पिढीचा मोबाईल नेटवर्क आहे, जो अतिशय वेगानं डेटा प्रसारित करतो. 3G आणि 4G च्या तुलनेत 5G चा वेग अतिशय जास्त आहे. 4G च्या तुलनेत 5 जी दहा पटीनं वेगानं सेवा देणार आहे. या सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण एन्ड टू एन्ड नेटवर्क भारतात तयार करण्यात आलं आहे.


लिलावातून सरकारला किती महसूल मिळला ?
5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव नुकताच पार पडला. यामधून केंद्र सरकारला 1.50 लाख रुपयांची बोली लागली. लिलावातून सरकारला सुरुवातीला 80,000-90,000 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.  दरम्यान, 5G सेवा सुरू झाल्यानंतर या तंत्रज्ञानामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. याशिवाय जागतिक स्तरावरही भारताला याचा मोठा लाभ मिळणार आहे. स्वदेशी 5G तंत्रज्ञान स्वदेशी 5G खाजगी कंपन्यांना जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्यास मदत करेल. 


सहाव्या भारतीय मोबाईल परिषदेचे उद्घाटन -
यावेळी सहाव्या भारतीय मोबाईल परिषदेचे उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. IMC “ नवे डिजीटल विश्व” या संकल्पनेसह 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान या भारतीय मोबाईल परिषद – 2022 चे उद्घाटन होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाच्या जलद स्वीकार  आणि प्रसारामुळे उदयाला आलेल्या विशेष संधीबाबत चर्चा करण्यासाठी आणि त्या मांडण्यासाठी आघाडीचे विचारवंत, उद्योजक, नवोन्मेषी आणि सरकारी अधिकारी एका मंचावर येणार आहेत.