नवी दिल्ली: तैवान आणि जपानमधील भूकंपाची घटना ताजी असतानाच आता हिमाचल प्रदेशातही भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हिमाचल प्रदेशातील चंबा परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र चंबा असले तरी 350 किलोमीटर अंतरावर असलेल्या मनालीतही भूकंपाचे सौम्य धक्के अनुभवायला मिळाले. हा भूकंप 5.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा असल्याची नोंद करण्यात आली आहे.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, रात्री साडेऊनच्या सुमारास चंबा परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. चंबा परिसरात फारशी मानवी वस्ती नाही. त्यामुळे या भूकंपाच्या धक्क्यांनी कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. यापूर्वी हिमाचल प्रदेशात 1 एप्रिल1905 रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपात तब्बल 1000 लोकांचा बळी गेला होता. हिमालच प्रदेशातील चामोली, लाहौल आणि स्पिती परिसरात हा तीव्र क्षमतेचा भूकंप झाला होता.
भूकंप आल्यानंतर जीव वाचवण्यासाठी काय कराल?
तुम्ही घरात असताना भुकंपाचे हादरे जाणवले तर टेबल किंवा बेड खाली जाऊन बसू शकता. याशिवाय इतर मार्गाने स्वत:ला कव्हर करुन शांतपणे एकाच ठिकाणी थांबू शकतात. शिवाय, तुम्ही भितींजवळ उभे राहू शकता. मात्र, खिडकी आणि फर्निचर शेजारी उभे राहणे, आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा ठिकाणी उभे राहणे टाळले पाहिजे. तुम्ही घरापासून दूर किंवा बाहेर असला तर सावध राहा. इमारती, वीजेचे खांब अंगावर कोसळू शकतात. त्यामुळे सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. वाहन चालवताना भूकंपाचे धक्के जाणवत असल्यास गाडी थांबवा. स्वतःला रहदारीपासून दूर ठेवा, अस तज्ज्ञ सांगतात.
इतर महत्वाच्या बातम्या