दिल्ली : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणींचा पाठलाग करणाऱ्या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे. स्मृती इराणींचा पाठलाग करणारे चारही तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचं तपासात समोर आलं आहे. या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
काल शनिवारी संध्याकाळी स्मृती इराणी विमानतळावरुन परतत असताना चार मद्यधुंद तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. तसंच स्मृती इराणी यांच्यासोबत म्यानमार दुतावासाजवळ हुज्जतही घातली. त्यानंतर फ्रान्स दुतावासाजवळ त्यांना ताब्यात घेण्यात आलं. हे चारही तरुण दिल्ली विद्यापीठातील मोतीलाल नेहरु कॉलेजचे विद्यार्थी आहेत.
स्मृती इराणी यांनी याप्रकरणी चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर चारही तरुणांची आरोग्य तपासणी करण्यात आली ज्यात ते नशेत असल्याचं समोर आलं. सध्या या चौघांचीही कसून चौकशी सुरु आहे. त्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.