लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज एकूण 12 जिल्ह्यातील 69 जागांसाठी मतदान झालं. शेवटची आकडेवारी हाती येईपर्यंत 61.16 टक्के मतदान झालं होतं. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत एकूण 826 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.
आजच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत एकूण 2.41 कोटी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाबला. यात अनेक दिग्गजांचाही समावेश होता. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, बसपा अध्यक्षा मायावती, मुख्यमंत्री अखिलेश यादव, त्यांचे वडील मुलायम सिंह यादव, काका शिवपाल सिंह यादव, काँग्रेसचे राज्यसभा सदस्य पी.एल. पुनिया आदींनी आपला मतदानाचा अधिकार बजावला.
या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगानं एकूण 25,603 मतदान केंद्रांची उभारणी केली होती. या टप्प्यात सर्वाधिक 21 उमेदवार हे इटावा या मतदार संघात आहेत. तर सर्वात कमी म्हणजे तीन उमेदवार हे हैदरगढ या मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लखनऊ पश्चिम आणि मध्य मतदार संघातून प्रत्येकी 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
दरम्यान, अजून उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यातील मतदान बाकी असून, यासाठी 23 आणि 27 फेब्रुवारी, तसेच 4 आणि 8 मार्च रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 11 मार्च रोजी होणार आहे.