नवी दिल्ली: जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला शुक्रवारी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आपले नापाक इरादे जाहीर करत सोशल मीडियावर प्रोपगंडा सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानने त्यांच्या वेगवेगळ्या देशांतील एम्बॅसींच्या माध्यमातून सातत्याने जम्मू काश्मीर संबंधीत मेसेज व्हायरल करण्याचं काम सुरू असल्याचं समोर आलं आहे. यासाठी पाकिस्तानने टूलकिट (Toolkit) बनवल्याचं उघडकीस आलं असून त्या माध्यमातून भारताला बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहेत. 


जम्मू आणि काश्मीरमधून 5 ऑगस्ट 2019 साली कलम 370 हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेले कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक विधेयक लोकसभेत 351 विरुद्ध 72 मतांनी विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. यावेळी जम्मू काश्मीर राज्याचे दोन भाग करण्याचे विधेयक मांडण्यात आलं होतं. त्यानुसार जम्मू काश्मीर आणि लडाख अशी दोन राज्य बनवण्यात आली. दोन्ही राज्य केंद्रशासित घोषित करण्यात आली.


या घटनेला शुक्रवारी तीन वर्षे पूर्ण होत असून त्यावर पाकिस्तानने चीन, बेल्जियम, जपान, युक्रेन, दुबई, ऑस्ट्रिया, इटली, डेन्मार्क, जर्मनी आणि अमेरिका या देशातील एम्बॅसीच्या माध्यमातून सातत्याने या विरोधात प्रोपगंडा सुरू केला असून तसे मेसेज ट्वीट करण्यात येत आहेत. 


काय आहे टूलकिट? 
टूलकिट हे एक डिजिटल माध्यम वा हत्यार आहे, ज्याचा वापर करुन कोणत्याही आंदोलनाला हवा कशी देता येईल किंवा त्या आंदोलनाचा विस्तार कसा करता येईल याची माहिती देण्यात येते. अमेरिकेतील 'ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर' या आंदोलनात अशा प्रकारचं टूलकिट पहिल्यांदा चर्चेत आलं होतं. या माध्यमातून आंदोलनात मोठ्या प्रमाणात लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. टूलकिटच्या माध्यमातून आंदोलन कसे करावे, त्याचा विस्तार टप्प्याटप्प्याने कसा करावा याची सखोल माहिती देण्यात येते.


आंदोलनादरम्यान पोलीस कारवाई झाली तर काय करावं, किंवा सोशल मीडियावर पोस्ट टाकताना कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती या टूलकिटच्या माध्यमातून देण्यात येते. तसेच आंदोलन करताना कोणतीही अडचण आली तर कोणाशी संपर्क साधावा याचीही माहिती या टूलकिटच्या माध्यमातून देण्यात येते.