लखनौ : म्हैस चोरीच्या संशयातून जमावाकडून एका व्यक्तीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील बरेलीतून समोर आला आहे. दुबईहून परतलेल्या तरुणाला गावकऱ्यांनी अमानुष मारहाण केली, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरु आहे.


केवळ संशयामुळे आणि अफवेमुळे केंट येथील 22 वर्षीय शाहरुख खानचा गावकऱ्यांनी जीव घेतल्याचा आरोप आहे. शाहरुख त्याच्या मित्रांसह म्हैस चोरण्यासाठी आला होता, असा गावकऱ्यांचा आरोप आहे. तर शाहरुखच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, तो 22 दिवसांपूर्वीच दुबईहून परतला असून तिथे तो टेलर आहे.

''भोलापूर डिंडोलिया गावात मंगळवारी रात्री अडीच वाजता म्हैस चोरीचं प्रकरण समोर आलं. चोरट्यांना गावकऱ्यांनी पळवून लावलं आणि एक तरुण मागे राहिला. गावकऱ्यांनी त्या तरुणाची चौकशी केली आणि 100 क्रमांकावर फोन करुन माहिती दिली. तरुण अंमली पदार्थाच्या नशेत होता आणि तो अंमली पदार्थांच्या आहारी गेलेला होता, त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं असता त्याचा मृत्यू झाला,'' अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी मृताच्या भावाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे, मात्र या प्रकरणात कुटुंबीयांनी वेगळाच आरोप केला आहे. तर गावकऱ्यांचंही वेगळंच म्हणणं आहे.