काश्मीरात तीन चकमकी, लष्कराकडून सहा दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद
एबीपी माझा वेब टीम | 28 Sep 2019 06:47 PM (IST)
जम्मू काश्मीरमध्ये आज तीन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले. रामबन येथे भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्याचबरोबर इतर दोन ठिकाणी झालेल्या दोन चकमकींमध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश मिळाले आहे.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये आज तीन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले. रामबन येथे भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यावेळी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले. त्याचबरोबर इतर दोन ठिकाणी झालेल्या दोन चकमकींमध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश मिळाले आहे. रामबनमधील एका घरात काही लोकांना बंदी बनवून दहशतवादी तिथे लपून बसले होते. सुरक्षाबलाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला बंदी बनवलेल्या लोकांना सोडवले. त्यानंतर दहशतवाद्यांना ठार केले. या चकमकीपूर्वी गांदरबलमध्येदेखील एक मोठी चकमक घडली. जवानांनी या चकमकीमध्येही तीन दहशतवाद्यांना ठार केले. त्यानंतर श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. तसेच एक बस थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जवानांनी संपूर्ण परिसरात घेराव घातला. अजूनही या परिसरात शोधमोहीम सुरु आहे.