नवी दिल्ली : गुजरातमध्ये काँग्रेसला भगदाड पडले आहे. बलवंत सिंह राजपूत, तेजश्री पटेल आणि पी आय पटेल या तीन आमदारांनी काँग्रेसला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने गुजरातमध्ये मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे.


तीन आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण भाजपमध्ये दाखल झालेल्या बलवंत सिंह यांना भाजपने राज्यसभेचे उमेदवार म्हणून घोषितही केले आहे.

गुजरातमध्ये राज्यसभेसाठी तीन जागांसाठी मतदान होणार आहे. दोन जागांवर अमित शाह आणि स्मृती इराणी उमेदवार आहेत. मतांचा विचार केल्यास या दोन्ही जागांवरील विजय निश्चित मानला जातो आहे. तिसऱ्या जागेवर काँग्रेसकडून अहमद पटेल उभे आहेत. मात्र, आता काँग्रेसमधूनच भाजपमध्ये आलेले बलवंत सिंह हे भाजपकडून अहमद पटेल यांना टक्कर देणार आहेत.

तीन आमदार भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसकडे आता 53 आमदार उरले आहेत. राज्यसभेचा उमेदवार जिंकवण्यासाठी काँग्रेसला 46 मतांची गरज आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, गुजरात काँग्रेसमधील आणखी काही आमदार ऐनवेळी भाजपमध्ये दाखल होऊ शकतात. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांचा राज्यसभेचा मार्ग खडतर होणार आहे.