मुंबई: सामान्य माणसांना त्यांच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातूनही एखादा हप्ता चुकला किंवा भरता आला नाही तर बॅंकांच्या छळवणूकीला सामोरं जावं लागतं. भारतात कर्जाची ही चिंता फक्त सामान्यांनाच आहे असं दिसतंय. कारण देशातील 264 बड्या लोकांकडे बँकांचे तब्बल 1.08 लाख कोटींचं कर्ज थकीत आहे. इतकं मोठं कर्ज असूनही त्यांना कोणतीच चिंता नाही. उलट ते निवांतपणे आपले अलिशान जीवन जगत असल्याचं समोर आलंय.


या संबंधी एका माहिती आधिकाराच्या अर्जावर उत्तर देताना RBI ने ही धक्कादायक माहिती दिली आहे. RBI ने सांगितलं आहे की देशात अशा प्रकारचे एकूण 1913 विलफुल डिफॉल्टर्स आहेत ज्यांच्याकडे जून 2020 पर्यंत भारतीय बॅंकांचे तब्बल 1.46 लाख कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे. या लोकांकडील असणाऱ्या कर्जाची वसूल करण्यासाठी कोणत्याही बॅंकानी कारवाई केली नसल्याचं निदर्शनास आलं आहे. खासकरुन सार्वजनिक बॅंकानी कोणतीत कारवाई न करता या लोकांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचं दिसतंय.


पुण्यातील विवेक वेलनकर यांनी विलफुल डिफॉल्टर्स बाबत काय स्थिती आहे यासंबंधी RBI कडे माहितीच्या अर्जाच्या माध्यमातून विचारणा केली होती. त्याला RBI ने उत्तर हे दिलं आहे. त्याबाबत अधिक माहिती सांगताना विवेक वेलनकर म्हणाले की, "RBI कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे स्पष्ट झालंय की भारतात 264 विलफुल डिफॉल्टर्स असे आहेत की त्यांच्या कर्जाची रक्कम 100 कोटीच्या वर आहे, 23 विलफुल डिफॉल्टर्स असे आहेत की त्यांचे थकीत कर्ज 1000 कोटींच्या वर आहे. त्यामध्ये 500 कोटी ते 1000 कोटी रुपयांचं कर्ज थकीत असणारे 34 बडे उद्योगपती आहेत तर 100 कोटी ते 500 कोटी रुपयांचं कर्ज थकीत असणारे 207 डिफॉल्टर्स आहेत. याचा अर्थ असा आहे की एकूण देशात 264 विलफुल डिफॉल्टर्स असे आहेत की त्यांच्याकडे भारतीय बॅंकांचे 1,08,527 कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे."


सर्वाधिक कर्ज मेहूल चोक्सी च्या बुडालेल्या कंपनीवर
यापैकी सर्वाधिक कर्ज हे मेहूल चोक्सीच्या गितांजली जेम्स लि. या कंपनीवर आहे. या कंपनीने 5,747.05 कोटी रुपयांचं कर्ज थकवलं आहे. त्याचसोबत गिली इंडिया आणि नक्षत्र ब्रॅन्ड्स लिं. या कंपन्यांनी अनुक्रमे 1,446 कोटी रुपये आणि 1,109 कोटी रुपयांचं कर्ज थकवलंय.


दुसऱ्या क्रमांकावर REI Agro Ltd ही कंपनी येते. या कंपनीकडे 3,516 कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे. या कंपनीचे संचालक संदिप झुनझुनवाला आणि संजय झुनझुनवाला यांचा ED गेल्या वर्षभरापासून तपास करत आहे.


भारतातील टॉप 10 विलफुल डिफॉल्टर्स कंपन्या




  • गितांजली जेम्स लि.- 5,747.05 कोटी रुपये

  • REI अॅग्रो लि.- 3,516 कोटी रुपये

  • फ्रॉस्ट इंटरनॅशनल लि.-3,097.64 कोटी रुपये

  • विन्डसम डायमंड अॅन्ड ज्वेलरी लि.-2975.73 कोटी रुपये

  • झूम डेव्हलपर्स प्रायव्हेट लि.-2580 कोटी रुपये

  • रोटोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लि.-2,530.95 कोटी रुपये

  • कुडोस केमी लि.-1,948.12 कोटी रुपये

  • एबीजी शिपयार्ड लि.-1874.90 कोटी रुपये

  • ट्रान्सस्ट्ऱॉय (इंडिया) लि.-1861.11 कोटी रुपये

  • फॉरएव्हर प्रिसियस ज्वेलरी अॅन्ड डायमंड लि.-1,653.25 कोटी रुपये


विलफुल डिफॉल्टर म्हणजे काय?
विलफुल डिफॉल्टर म्हणजे असे उद्योगपती किंवा अशा कंपन्या असतात ज्यांच्याकडे कर्ज चुकवण्याची क्षमता असते पण ते जाणीवपुर्वक कर्ज चुकवत नाहीत. ज्या कारणासाठी त्यांनी कर्ज काढलेलं असतं त्या कारणासाठी खर्च न करता त्याचा वापर इतर कारणासाठी केला जातो. आपली एखादी संपत्ती तारण ठेवली जाते आणि त्यावर कर्ज काढलं जातं, आणि नंतर बॅकांना माहिती न देता त्याची परस्पर विक्री केली जाते अशा लोकांनाही या श्रेणीत टाकलं जातं.