सटना (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशमधील एका व्यक्तीच्या पोटातून चक्क 263 नाणी, चैन आणि 10-12 शेव्हिंग ब्लेड्स, काचेचे तुकडे काढले. रेवा जिल्ह्यातील डॉक्टरांनी यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली. ज्याच्या पोटातून हे सारं बाहेर काढलं, ती व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


सटना जिल्ह्यातील सोहावलचे रहिवाशी असलेले 32 वर्षीय मोहम्मद मकसूद यांना 18 नोव्हेंबर रोजी पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर  रेवा जिल्ह्तील संजय गांधी मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

डॉ. प्रियांक शर्मा यांच्या माहितीनुसार, मोहम्मद मकसूद यांच्या पोटदुखाचं कारण कळल्यानंतर काही टेस्ट करुन, एक्स-रे रिपोर्ट मागवण्यात आले. त्यानंतर सहा डॉक्टरांच्या टीमने सर्जरी करुन, 10-12 शेव्हिंग ब्लेड्स, 4 सुया, चैन, 263 नाणी आणि काचेचे तुकडे पोटातून काढले. या सर्व गोष्टींचं एकूण वजन 5 किलोएवढे होते.

मोहम्मद मकसूद यांची मानसिक स्थिती स्थीर नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सध्या मकसूद यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.