नवी दिल्ली : गुजरातच्या विधानसभा निवडणुकांमुळे सध्या देशाचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पंतप्रधान मोदींना त्यांच्याच बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी काँग्रेस आकाश-पाताळ एक करत आहे. त्यातच नोटबंदी आणि जीएसटीसारख्या मुद्दांचं काँग्रेसनं भांडवलं केलं जात आहे.


मात्र, देशाचे अर्थमंत्री अरुण जेटलींनी काँग्रेसच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत गुजरातमध्ये सत्तारुढ पक्षाची लाट असून, काँग्रेस विकास विरोध असल्याचा दावा केला.

अरुण जेटली म्हणाले की, "राज्यात प्रस्थापितांविरोधातील लाट नाही, तर सत्तारुढ पक्षाचीच लाट आहे. तसेच देश विकासाच्या वाटेवर असून, जीडीपीच्या आकडेवारीत सुधारणा होत आहे."

जीएसटीमधील टॅक्स दराबाबत विचारले असता, अरुण जेटली म्हणाले की, "ज्या वस्तूंवर सध्या 18 टक्के टॅक्स आकारला जातो. त्याच वस्तूंवर काँग्रेसच्या काळात 31 टक्के कर आकारला जात होता."

काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवताना जेटली म्हणाले की, "काँग्रेस गुजरातमध्ये विकासविरोधी राजकारण करत आहे. जगातल्या कोणत्याच लोकशाही देशात  विकासाची खिल्ली उडवली गेली नसेल."

गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण देण्याच्या प्रश्नावर जेटली म्हणाले की, "गुजरातमधील पाटीदार समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन हे म्हणजे बेजबाबदार पणाचं वक्तव्य आहे. हार्दिक पटेल आणि काँग्रेस एकमेकाची फसवणूक करत आहेत. जातीयवादी आंदोलनातून गुजरातमध्ये कोणालाही राजकीय फायदा मिळणार नाही."

दरम्यान, गेल्या काही वर्षात गुजरातमध्ये दलितांवर झालेले हल्ल्याविरोधात जनक्षोभ आहे. दलित नेता जग्नेश मेवानी हा याचं नेतृत्व करत आहे.

यावरुनही अरुण जेटलींनी निशाणा साधला. जेटली म्हणाले की, “काँग्रेसने ज्या लोकांशी हातमिळवणी केली आहे. ते अराजक पसरवण्याचं प्रतीक बनत आहेत.”