मुंबई: सप्टेंबर महिन्यात अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना घडल्या आहेत. आजच्याच दिवशी थोर समाजसुधारक ईश्वर चंद्र विद्यासागर यांचा जन्म झाला होता. तसेच भारतीय आर्थिक उदारीकरणाचे जनक समजल्या जाणाऱ्या अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्मही 26 सप्टेंबर रोजीचा. सदाबहार अभिनेता देवआनंद यांचा जन्मही आजच्याच दिवशी. त्यामुळे 26 सप्टेंबर हा दिवस इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. 


1820- ईश्वरचंद्र विद्यासागर जन्मदिन 


गरीब, स्त्रिया आणि दलितांचे कैवारी अशी ओळख असलेल्या थोर समाजसुधाक ईश्वर चंद्र विद्यासागर (Ishwar Chandra Vidyasagar Birth) यांचा जन्म 26 जुलै 1820 रोजी झाला होता. बंगाल आणि भारतात सुरुवातीच्या काळात ज्या काही समाजसुधारण्या झाल्या त्या सुधारणांचे अग्रणी म्हणून ईश्वरचंद्र विद्यासागर यांना ओळखलं जातं. 


19 व्या शतकाच्या सुरुवातीला राजा राममोहन रॉय यांनी सुरू केलेल्या सामाजिक सुधारणांची चळवळ पुढे सुरू ठेवण्याचं काम ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केलं. विद्यासागर एक लेखक, बुद्धीवादी आणि समाजसुधारक होते. त्यांचे पुस्तक 'बोर्नो पोरीचॉय' (अक्षर परिचय) अजूनही बंगाली वर्णमाला शिकण्यासाठी प्रारंभिक मजकूर म्हणून संदर्भासाठी वापरलं जातं. ईश्वरचंद विद्यासागर यांनी महिलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला आणि त्यांनी बालिका विद्यालयांची स्थापना केली. 


1923- देव आनंद यांचा जन्मदिन 


तब्बल सहा दशकं आपल्या अदाकारीने, अभिनयाने बॉलिवूडवर राज्य करणारे सदाबहार अभिनेता देवानंद ( Dev Anand Birth Anniversary) यांचा आजच्याच दिवशी म्हणजे 26 सप्टेंबर 1923 रोजी जन्म झाला. त्यांचा जन्म पंजाबमधील गुरूदासपूरमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. ते भारतीय सिनेमातील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक होते. 2002 साली त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. 


1932- डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 


पंतप्रधान मनमोहन सिंग (Dr Manmohan Singh) यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला. 1957 साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर 1962 साली डॉ. सिंग यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी. फील संपादन केली. 


भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या आर्थिक उदारीकरणाचे श्रेय हे डॉ. मनमोहन सिंह ( Father Of Indian Economic Reforms ) यांना जातं. 1991-1996 या पाच वर्षांच्या काळात डॉ. सिंग यांनी भारताचे अर्थमंत्रिपद भूषवले. भारताच्या आर्थिक सुधारणा अमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्वंकष धोरण तयार करण्यात सिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर 2004 ते 2014 या काळात त्यांनी भारताचे दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं. 


1956- लक्ष्मण किर्लोस्कर यांचे निधन


उद्योजक आणि किर्लोस्कर उद्योग समुहाचे संस्थापक लक्ष्मण किर्लोस्कर ( Laxman Kirloskar ) यांचे 26 सप्टेंबर 1956 रोजी निधन झाले. त्यांनी किर्लोस्कर उद्योगाची सुरुवात केली. शेतीसाठी त्यांनी बनवलेल्या लोखंडी नांगरांचा फाळ हे किर्लोस्कर समूहाचे पहिले उत्पादन होते. किर्लोस्करवाडी येथे त्यांनी 1910 साली कारखाना काढला. तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी औद्योगिक वसाहत स्थापन केली.


1958- विश्व मुकबधीर दिन 


मुकबधिरांच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय हक्कांसाठी दरवर्षी 26 सप्टेंबर हा दिवस जागतिक मुकबधीर दिन (World Deaf Dumb Day) म्हणून साजरा केला जातो. 1958 साली पहिल्यांदा या दिवसाची सुरूवात करण्यात आली. अलिकडे हा दिवस सप्ताहाच्या स्वरुपात साजरा केला जात आहे. 


1989- गायक हेमंत कुमार यांचे निधन  


बॉलिवूड आणि बंगाली प्रसिद्ध गायक हेमंत कुमार ( Hemant Kumar ) यांचे निधन 26 सप्टेंबर 1989 रोजी झालं. हेमंत दा या नावाने ते प्रसिद्ध होते. आपल्या गायिकेने त्यांनी बॉलिवूड आणि बांग्ला संगीतावर वेगळी छाप उमटवली. 


1998- सचिनने मोडला डेसमंडचा विश्वविक्रम 


आजच्याच दिवशी सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) सचिन तेंडुलकरने आजच्या दिवशी झिबाँबे विरोधात एकदिवसीय सामन्यात 18 वे शतक ठोकले आणि डेसमंड यांचा विश्वविक्रम मोडला.  सचिन तेंडुलकरने सर्वाधिक म्हणजे 100 शतकं मारण्याचा विश्वविक्रम केला असून सर्वाधिक धावाही त्याच्याच नावावर आहेत.