On This Day In History : आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात. आज समाजसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या बाबा आमटे यांची जयंती आहे. 26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या शहरात त्यांचा जन्म झाला होता. मुरलीधर देवीदास आमटे असे त्यांचे मूळ नाव. देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी कुष्ठरोग निर्मूलनाप्रमाणेच देशातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली. तसेच देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत देखील बाबा आमटे यांचा सहभाग होता. त्यांनी आपले संपुर्ण जीवन गोरगरीब व कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी समर्पित केले. त्यांचा आदिवासी समाजाविषयी असणारा आदरभाव आणि उत्कंठा त्यांच्या कार्यातून दिसून येते.


1899: स्वातंत्र्यसैनिक उधम सिंह यांची जयंती


उधम सिंह हे महान क्रांतिकारी आणि स्वातंत्र्यसैनिक होते. आज त्यांची जयंती आहे. सरदार उधम सिंह यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला जनरल डायरला लंडनमध्ये गोळ्या घालून घेतला होता.


1919 : प्रसिद्ध संगीतकार नौशाद अली यांचा जन्मदिवस 
 
प्रसिद्ध संगीतकार नौशाद अली यांचा आज जन्मदिवस आहे. नौशाद अली यांचा जन्म 25 डिसेंबर 1919 रोजी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे झाला. नौशाद यांनी 'कोहिनूर' (1960), 'गंगा-जमुना' (1961), 'सन ऑफ इंडिया' (1962), 'लीडर' (1964), 'दिल दिया दर्द लिया' (1965), 'पाकीजा' (1971) ,  'तेरी पायल मेरे गीत' (1989) सह अनेक चित्रपटांना संगीत दिले. 2005 मध्ये आलेल्या 'ताजमहल: एन इटरनल लव्ह स्टोरी' या चित्रपटात त्यांनी शेवटचे संगीत दिले होते. बीआर चोप्रा यांच्या 'हुब्बा खातून' चित्रपटासाठीही त्यांनी संगीत दिले होते, मात्र हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. नौशाद यांनी त्यांच्या कारकिर्दीत केवळ 67 चित्रपटांना संगीत दिले, पण लोक आजही त्यांची गाणी ऐकतात. 5 मे 2006 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.


1925 : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना


भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) हा भारतातील एक कम्युनिस्ट पक्ष आहे. या पक्षाची स्थापना 26 डिसेंबर 1925 रोजी कानपूर शहरात झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना एम.एन. राय यांनी केली. 1928 मध्ये कम्युनिस्ट इंटरनॅशनलने भारतात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. डी राजा हे या पक्षाचे सरचिटणीस आहेत. हा भारतातील सगळ्यात जुन्या पक्षांपैकी एक आहे. या पक्षाला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.