बेळगाव : सैनिकांच्या जीवनात शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची असते. मराठा लाईट इन्फन्ट्रीला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. ही परंपरा आणि शौर्याचा वारसा   जतन करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. प्रशिक्षण काळात तुम्हाला मिळालेल्या प्रशिक्षणाचा सेवा बजावताना उपयोग होणार आहे,असे उदगार मेजर जनरल व्ही. के. एच. पिंगळे यांनी काढले.

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 236 जवानांचा शानदार दीक्षांत आणि शपथविधी  समारंभ  पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महू येथील आर्मी वॉर कॉलेजचे कमांडर मेजर जनरल  व्ही. के. एच. पिंगळे बोलत होते.



तिरंगा आणि रेजिमेंटच्या ध्वजाच्या साक्षीने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी देशसेवेची आणि सर्वोच्च त्यागाची शपथ घेतली. तळेकर ड्रिल स्क्वेअर येथे झालेल्या दीक्षांत आणि शपथविधी समारंभाला मराठा लाईट इन्फन्ट्रीचे कमांडंट ब्रिगेडियर प्रवीण शिंदे यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांकडून पिंगळे यांनी मानवंदना स्वीकारली.

कॅप्टन रॉबिन अब्राहम यांच्या मार्गदर्शनाखाली जवान सुदर्शन वडगावे याने परेडचे नेतृत्व केले. जवान दिनेश खोत, सुदर्शन वडगावे, अक्षय चव्हाण, वैभव चव्हाण आणि अक्षय चव्हाण याना प्रशिक्षणा दरम्यान बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मेजर जनरल व्ही. के. एच. पिंगळे  यांच्या हस्ते मेडल आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. दीक्षांत आणि शपथविधी समारंभाला प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते.