एअर इंडियात 225 कोटींचा सॉफ्टवेअर घोटाळा
एबीपी माझा वेब टीम | 14 Jan 2017 08:45 PM (IST)
मुंबई : एअर इंडियामध्ये 225 कोटींचा सॉफ्टवेअर घोटाळा झाल्याचं समोर आलं असून याप्रकरणी सीबीआयने एअर इंडिया, सॅप एजी आणि आयबीएम या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या आरटीआयनंतर हा घोटाळा उघडकीस आला. एअर इंडियामध्ये सॅप प्रणाली कार्यान्वित करावी, असा निर्णय एअर इंडियाच्या संचालक मंडळाने घेतला होता. यासाठी पुरवठा आणि विल्हेवाट महासंचालनालय यांच्या दराप्रमाणे 225 कोटींची निश्चिती करण्यात आली. त्यामुळे जाहिरात दिली गेली नाही. अनिल गलगली यांनी याबाबतीत केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली होती. आयोगाने सर्व दस्तावेजाचा सखोल अभ्यास करत सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. त्यानंतर आता सीबीआयने चौकशीअंती गुन्हा दाखल केला आहे.