कोलकाता : कोलकातामध्ये एका 22 वर्षीय हवाई सुंदरीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. क्लारा खोंगशित असं या तरुणीचं नाव आहे.


मंगळवारी रात्री उशिरा क्लारा आपल्या मित्रांसोबत तिच्या घरी पार्टी करत होती. त्याचवेळी अचानक चौथ्या मजल्यावरुन खाली पडून तिचा मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बुधवारी सकाळी घरासमोर तिचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लारा ही शिलाँगची आहे. ती आपल्या दोन मित्रांसोबत घरी बर्थडे पार्टी एन्जॉय करत होती. त्यानंतरच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे आता पोलीस त्या दिशेनंही तपास करत आहेत.

मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर फॉरेन्सिक टीमनंही घटनास्थळी जाऊन काही पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. क्लारा काम करत असलेल्या एअर लाईनमधील एका कर्मचाऱ्यानं याबाबत माहिती देतानं सांगितलं की, 'या घटनेची माहिती आम्हाला मीडियाच्या माध्यमातूनच मिळाली. आम्ही याविषयी काहीही बोलू इच्छित नाही. पोलीस चौकशीनंतर याबाबतचं सत्य समोर येईलच.' दरम्यान, ही हत्या आहे की आत्महत्या या दोन्ही अँगलनं पोलीस सध्या तपास करत आहेत.