नवी दिल्ली : कारगिल विजय दिवसाची 20 वी वर्षपूर्ती आज देशभर साजरी केली जात आहे. 26 जुलै 1999 रोजी पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या घटनेला आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय जवानांनी मोठ्या शौर्याने पाकिस्तानला चोख उत्तर दिलं होतं.


कारगिल विजय दिनानिमित्ताने द्रासमधील कारगिल युद्ध स्मारकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद तर दिल्लीतील वॉर मेमोरियलवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शहिदांना श्रद्धांजली वाहतील. शिवाय, राज्यासह देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.


कारगिल विजय दिवसाची 20 वी वर्षपूर्ती 25 जुलै ते 27 जुलै अशी तीन साजरी होत आहे. या कार्यक्रमाचा समारोप 27 जुलैला इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये होईल. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होणार आहेत.


20 वर्षापूर्वी कारगिलमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं होतं. 8 मे ते 26 जुलै दरम्यान झालेल्या युद्धात भारताचे 527 जवान शहीद झाले होते, तर 1363 जवान जखमी झाले होते. या सर्वांना मानवंदना देण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो.


कारगिल विजय दिनानिमित्त 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' पुन्हा रिलीज होणार


राज्यात आज कारगिल विजय दिनानिमित्त 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' हा सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे. 2016 मध्ये दहशतवाद्यांनी उरी येथे भारतीय जवानांच्या कॅम्पवर हल्ला केला होता. उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांवर भारताने सर्जिकल स्ट्राईक केलं होतं, यावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमाता अभिनेता विक्की कौशलने प्रमुख भूमिका साकारली आहे. तर आदित्य धरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.


उरी हल्ल्यात 17 जवान शहीद झाले होते. राज्यातील जवळपास 500 सिनेमागृहांमध्ये उरी सिनेमा मोफत दाखवण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने याचं आयोजन करण्यात आलं आहे. युवकांमध्ये देशाप्रती कर्तव्य भावना आणि राष्ट्रभक्ती जागृत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.