पहलगाम क्लबमध्ये टीना आणि अतहर यांनी शनिवारी लगीनगाठ बांधली. टीना आणि दाबी कुटुंबीय शुक्रवारी पहलगाममध्ये आले होते. लग्नानंतर सर्व जण दक्षिण काश्मिरमधील अनंतनागमध्ये असलेल्या देवपुरा मत्तान या खान कुटुंबाच्या गावी रवाना झाले.
दोनच आठवड्यांपूर्वी टीना आणि अतहर यांचा साखरपुडा झाला होता. इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर दोघांच्या लग्नाचे फोटो अपलोड करण्यात आले आहेत.
2015 साली केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी स्पर्धेत भारतात पहिली आलेली टीना आणि याच परीक्षेत दुसऱ्या स्थानावर आलेला अतहर एकमेकांच्या प्रेमात पडले.
'ऑगस्ट महिन्यात डीओपीटीमध्ये ट्रेनिंगच्या वेळी दोघांची भेट झाली. पहिल्याच नजरेत प्रेम जडल्याचं टीना दाबीने सांगितलं होतं. अतहर फारच चांगला माणूस आहे, अशा भावनाही तिने व्यक्त केल्या होत्या.
टीना दाबी ही दलित समाजातील असून अतहर काश्मिरी मुसलमान आहे. अतहर हा काश्मिरमधील छोट्या गावातून आलेला आहे. तर टीनाचं बालपण दिल्लीतच गेलं आहे. टीनाने अतहरसोबतचे काही फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर दोघांवर टीकेची झोड उठली होती.
हिंदू महासभेने टीनाच्या पालकांना पत्र लिहून हे लग्न म्हणजे 'लव्ह जिहाद' असल्याचा दावा केला होता.