लखनऊ : उत्तर प्रदेशात जोरदार मुसंडी मारत एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी शर्यत तीव्र झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांची नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. या दोघांमधील कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडते, हे उद्याच स्पष्ट होईल.


भाजपच्या संसदीय मंडळाची उद्या संध्याकाळी बैठक आहे. या बैठकीला भाजपाध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संसदीय मंडळ उपस्थित राहणार आहे. याच बैठकीत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथील मुख्यमंत्रिपदी कोण बसेल, याची निवड केली जाईल.

पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपचं सरकार स्थापन केलं जाईल, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडते, याची उत्सुकता उत्तर प्रदेशातील जनतेसह संपूर्ण देशवासियांना लागली आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आणि आगामी राजकीय वाटचालीसाठीही महत्त्वाचा टप्पा म्हणून या राज्याकडे पाहिलं जातं.

दरम्यान, भाजपाध्यक्ष अमित शाह यांना, तुम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणार का, असा प्रश्न विचारला गेला, त्यावेळी ते म्हणाले, "माझ्याकडे आणखी खूप जबाबदाऱ्या आहेत. शिवाय, मी उत्तर प्रदेशचा मतदारही नाही." त्यामुळे अमित शाह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील, अशा ज्या काही चर्चा सुरु होत्या, त्यांनाही पूर्णविराम मिळाला आहे.

आता भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी कुणाची निवड केली जाते, याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.