लखनऊ : उत्तर प्रदेशातील यादव कुटुंबातील यादवीत अखिलेश यादव यांची सरशी झाली आहे. कारण अवघ्या 12 तासात अखिलेश आणि रामगोपाल यांचं निलंबन मुलायम यांनी मागे घेतलं आहे.
इतकंच नव्हे तर शिवपाल आणि अखिलेश या दोघांनीही जाहीर केलेल्या उमेदवारांच्या याद्याही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळं आता नव्यानं मुलायम, अखिलेश आणि शिवपाल उमेदवारांची निवड करणार आहेत.
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुलायम सिंह यादव यांचं कुटुंब विखुरलं होतं. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि चुलत भाऊ रामगोपाल यादव यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं होतं. आता ते मागे घेण्यात आलं आहे.
अबू आझमी, आझम खान यांच्यासह अखिलेश यादव मुलायम सिंह यांच्या घरी पोहोचले होते. इथे त्यांची बैठक झाली. यावेळी अखिलेश यादव यांनी 207 आमदारांची यादी मुलायम सिंह यांना सोपवली.
समर्थकांची बैठक
अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यादव या आपापल्या समर्थकांची बैठक बोलावली होती. पण मुख्यमंत्री अखिलेश यादव मुलायम यांच्यावर भारी पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. कारण अखिलेश यांच्या बैठकीत 198 आमदार आणि 25 मंत्री उपस्थित होते. तर मुलायम यांच्या बैठकीत आतापर्यंत केवळ 11 आमदार आणि 67 उमेदवार दाखल झाले.
दरम्यान, या बैठकीत अखिलेश यादव यांना अश्रू अनावर झाले. "मी वडिलांपासून वेगळा झालेलो नाही. उत्तर प्रदेश विधानसभा जिंकून त्यांना भेट देणार," असं अखिलेश म्हणाले.
नेमका वाद काय?
निवडणुकांच्या तोंडावर जो कोणी पक्षात येईल, त्याला प्रवेश द्यायचा हा शिवपाल यादव यांचा निर्णय. मात्र त्याला मुख्यमंत्री आणि पुतण्या अखिलेश यांचा विरोध होता.
त्यातच सप्टेंबर महिन्यात गायत्री प्रजापती, राजकिशोर सिंह या दोन मंत्र्यांना पैशांच्या अफरातफरीच्या आरोपावरुन अखिलेशनं मंत्रिमंडळातून हाकललं. हे दोन्हीही मंत्री शिवपाल यांच्या जवळचे.
त्यानंतर शिवपाल यादव यांची सगळी महत्वाची खाती काढून घेतली. या कृतीनं दोघांमधली दरी चांगलीच रुंदावली. हा सर्व वाद दीड महिन्यापूर्वीचा होता. त्यानंतर स्वत: नेताजींनी म्हणजेच मुलायम सिंहांनी हा वाद मिटवला होता. शिवपाल परत मंत्रिमंडळात आले होते.
पुन्हा वाद उफाळला
शिवपाल यादव हे मुलायमसिंहांचे लहान बंधू. तेच त्यांच्या जास्त जवळचे आहेत. त्यामुळेच शिवपाल यांनी मंत्रिमंडळात परतल्यानंतर अखिलेश समर्थकांवर धडाधड वार करण्यास सुरुवात केली.
अखेरीस या सगळ्याचा स्फोट झाला. अखिलेशनं दीड महिन्याच्या काळात पुन्हा एकदा आपल्या काकाला हिसका दाखवला. थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन. म्हणजे ज्या शिवपाल यांच्याकडे सिंचन, पीडब्लूडी, महसूल यासह सहा महत्वाची खाती होती ते एका झटक्यात मंत्रिमंडळातून बाहेर फेकले गेलेत. अर्थात या चालीला उत्तर द्यायला मुलायम यांना दोन तासही लागले नाहीत. त्यांनी तातडीनं अखिलेशचे गुरु मानले जाणारे रामगोपाल यादव यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केलं. वर त्यांच्यावर भाजपशी साटंलोटं करुन पक्षाला संपवण्याचा कट रचल्याचा आरोपही केला.
कोण कुणाच्या बाजूने?
मुलायम सिंह |
अखिलेश यादव |
शिवपाल यादव (सख्खाभाऊ) |
पत्नी डिंपल यादव |
मुलायम सिंहांची पत्नी साधना |
रामगोपाल यादव (मुलायम सिंहांचे चुलतभाऊ) |
मुलगा प्रतिक यादव |
अक्षय यादव (रामगोपाल यांचे पुत्र) |
शिवपाल यांचा मुलगा आदित्य |
|