मुंबई : थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईसह देशभरातील सर्व शहरं सज्ज झाली आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक हॉटेल, रेस्टॉरंट, पब, इत्यादी ठिकाणी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.
मात्र यावर्षीच्या सेलिब्रेशनला नोटबंदीची किनार आहे. त्यामुळे कैशलेस सेलिब्रेशनचं आव्हान स्वीकारण्यासाठी अनेक आयोजक सज्ज झाले झाले आहेत. पेटीएम, स्वाईम मशीन, इ-वॉलेट, ऑनलाईन बँकींग इत्यादी सुविधा अनेक ठिकाणी पुरवण्यात येणार आहे.
मुंबईत रात्री 12 नंतर विशेष लोकल
तर मुंबईत थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन केल्यानंतर उशिरा घरी परतणाऱ्यांसाठी विशेष लोकल सोडण्यात येणार आहे. मध्य रेल्वे सीएसटी-कल्याण मार्गावर 1 अप तर 1 डाऊन लोकल सोडणार आहे. तर सीएसटी-पनवेल मार्गावरही 1 अप आणि 1 डाऊन लोकल सोडण्यात येणार आहे. तसंच पश्चिम रेल्वे 2 अप आणि 2 डाऊन लोकल सोडणार आहे.
थर्टी फर्स्टला एक दिवसाचा मद्य परवाना नाही!
31 डिसेंबरला दारु पिऊन झिंगणाऱ्या तळीरामांची नशा उतरवण्यासाठी राज्य सरकारने नवा उतारा शोधला आहे. 31 डिसेंबरला एका दिवसाचा दारु परवाना न देण्याचे आदेश राज्य सरकारने महसूल खात्याला दिले आहेत. महामार्गापासून 500 मीटरच्या परिसरात मद्याचा वापर करता येणार नाही, असा आदेश उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टला पार्ट्यांचा बेत आखणाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. परिणामी, अनेकांना शहाराबाहेरचा रस्ता धरावा लागणार आहे.
नववर्षासाठी साईंची शिर्डी सज्ज
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईंची शिर्डी सज्ज झाली आहे. 2016 या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो साईभक्त शिर्डीत दाखल होत आहेत. सर्वांना साई समाधीचं दर्शन घेता यावं यासाठी आज, 31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. त्यामुळे साई भक्तांना मोठी सुविधा मिळेल. याशिवाय संस्थानच्या वतीने नव्यानेच सुरु झालेले टाइम दर्शन सुविधेचे पास सुलभरित्या मिळावे यासाठी सोय करण्यात आली आहे.