अहमदाबाद : सामान्यत: एखाद्या व्यक्तीने खून केला तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. त्यानंतर त्याच्यावर खटला चालतो आणि त्याला शिक्षा ठोठावण्यात येते. पण पहिल्यांदाच एखाद्या जनावरावर हत्येचा आरोप करुन गजाआड करण्यात आला आहे. माणसांच्या शिकारीबाबत पहिल्यांदाच सिंहांना कैद करण्यात आलं आहे. इतकचं नव्हे तर हत्येसाठी आरोपी ठरलेल्या एकूण 18 सिंहांना कैदेतही ठेवण्यात आलं आहे. गुजरातच्या अहमदाबादच्या सासणमध्ये ही घटना घडली आहे.

 

 

गेल्या अनेक दिवसांपासून अहमदाबादजवळच्या आबंरडी, कोदिया आणि दूधिया गावांमध्ये या सिंहांची दहशत होती. 3 महिन्यात या सिंहांनी 4 जणांची शिकार केली, तर 6 जणांना गंभीर जखमी केलं. यानंतर वन विभागाने कारवाई करत 18 सिंहांना पकडलं आणि सगळ्यांना कैदेत ठेवलं आहे.

 

 

तपासानंतर या 18 सिंहांपैकी जे सिंह नरभक्षक असतील, तसंच ज्यांनी माणसांची शिकार केली आहे, त्यांना दोषी ठरवून आजन्म कैदेत ठेवलं जाईल.

 

 

माणसांची शिकार कोणत्या सिंहाने केली, यासाठी शिकार झालेल्या ठिकाणाहून सिंहांच्या पायाचे ठसे घेतले जाणार आहेत. ज्या सिंहांचे पायाचे ठसे घटनास्थळावरच्या ठश्यांशी जुळतील, त्याला दोषी ठरवलं जाणार आहे. तर उर्वरित सिंहांना पुन्हा गीर अभयारण्यात सोडण्यात येईल.

 

 

इतकंच नाही तर सिंहांच्या विष्ठेचंही सात दिवस परीक्षण केलं जाईल. सिंहांच्या विष्ठेत मानवी मांस, शिकार झालेल्या माणसाचे कपडे आणि अवशेषांची तपासणी होईल. त्याचबरोबर सिंहांच्या प्रत्येक दिवसाच्या वागणुकीवरही देखरेख ठेवण्यात येणार आहे.