बाडमेर : राजस्थानमधील बाडमेरच्या जसोलमध्ये धार्मिक कार्यक्रमात मंडप कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांना मृत्यू झाला आहे, तर 45 जण जखमी झाले आहेत. गावात राम कथा वाचनाच्या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली.
मंडप पडल्यानंतर अनेकांना विजेचा धक्का बसला, अशी माहिती समोर येत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जोरदार वाऱ्यामुळे हा मंडळ कोसळल्याचं सांगितलं जात आहे.
राम कथा वाचनाच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी जमली होती. मंडप पडल्यानंतर उपस्थित नागरिक मंडपाखाली अडकून पडले आणि जखमी झाले. मंडप कोसळल्यानंतर विजेच्या तारा आणि मंडप उभारणीसाठी वापरलेल्या लोखंडी खांबाचा संपर्क झाला. त्यामुळे विजेच्या धक्क्यामुळेच अनेकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिक प्रशासनाने याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही.
या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दुख: व्यक्त केले आहे. तर जखमींवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.