Trinamool Congress : पक्षाच्या अंतर्गत संघर्षाचा धक्का काँग्रेसला आणखी एका राज्यात बसला आहे. मेघालयामधील नाराज 12 आमदारांनी काँग्रेस पक्षाला रामराम केलाय. गुरुवारी 17 पैकी काँग्रेसच्या 12 आमदारांनी पक्ष सोडल्यामुळे मेघालयात काँग्रेसचे फक्त पाच आमदार राहिले आहेत. मेघालयामधील काँग्रेसच्या 12 आमदारांनी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रस पक्षात प्रवेश केला. या 12 आमदाराच्य पक्ष प्रवेशामुळे तृणमूल काँग्रेसची मेघालयातील ताकद वाढली आहे.


गुरुवारी मेघालयात मोठा राजकीय भूकंप झाला. देशातील विभाजक शक्तींना तोंड देण्यास काँग्रेस पक्षाला अपय़श आल्याचा ठपका या आमदाराचे नेते मुकुल संगमा यांनी ठेवलाय. या 12 आमदारांनी पक्ष सोडल्याचा मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. मेघालयामध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची ताकद वाढली आहे. राज्यात अस्तित्व नसलेल्या तृणमूल काँग्रेस पक्ष आघाडीचा विरोधी पक्ष ठरला आहे.






मुकुल संगमा यांनी 2010 ते 2018 या कालावधीत मेघालयाचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेय. मुकुल संगमासारख्या दिग्गज नेत्याच्या जाण्याचा काँग्रेसला मोठा फटका बसलाय. तर तृणमूल काँग्रेसला फायदा झालया. आपली निष्ठा बदलण्याच्या निर्णयाचे मूळ, अधिकाधिक बळकट होणाऱ्या भाजपशी लढा देण्यातील काँग्रेसच्या अपयशात असल्याचे संगमा यांनी पक्षाला रामराम ठोकताना सांगितले.  


2023 मध्ये मेघालयामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.  त्या पार्श्वभूमीवर राज्यातील तृणमूल काँग्रेसची ताकद चांगलीच वाढली आहे.मुकुल संगमा गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसवर नाराज होते. त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेत आपली नाराजी जाहीर केली होती. मात्र, तरीही ऑगस्टमध्ये प्रदेशाध्यक्षपदी व्हिन्सेंट एच. पाला यांची नियुक्ती झाली, तेव्हापासून संगमा नाराज होते. आपल्या परवानगीशिवाय ही नियुक्ती झाल्याचा दावा त्यांनी केला होता. पाला यांच्या सत्कार समारंभाकडे त्यांनी पाठ फिरविली होती. त्यानंतर दिल्लीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यात अपयश आलं. गुरुवारी अखेर मुकुल संगमा यांनी आपल्या आमदारासह तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.