12 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात गुरुवारी (दि.16) सुरक्षा दलांशी झालेल्या भीषण चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा झालाय. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. दक्षिण विजापूरच्या जंगलात सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही चकमक झाल्याचे त्यांनी सांगितले. आज संध्याकाळपर्यंत ही गोळीबार सुरूच होता. दरम्यान, यानंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. या कारवाईत एक हजार सैनिकांचा सहभाग आहे. जवानांनी 50-70 नक्षलवाद्यांना घेरल्याची माहिती आहे. आयजी पी सुंदरराज यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात येत आहे.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9 वाजता जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. बिजापूरच्या एएसपींनी चकमकीला दुजोरा देत सांगितले की, 'विजापूर सीमा भागात नक्षलवाद्यांसोबत चकमक सुरू आहे.'विजापूर-सुकुमाचे डीआरजी सैनिक, सीआरपीएफच्या 5 कोब्रा युनिट्स, सीआरपीएफच्या 229 व्या बटालियनचे जवान या ऑपरेशनमध्ये सहभागी आहेत.'

पुढे बोलताना ते म्हणाले की, 'प्राथमिक माहितीनुसार चकमकीत 12 नक्षलवादी मारले गेले. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. तपशीलवार माहितीची प्रतीक्षा आहे. सुरक्षा दलाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. यासोबतच या महिन्यात आतापर्यंत राज्यात विविध चकमकीत 26 नक्षलवादी ठार झाले आहेत. 12 जानेवारी रोजी विजापूर जिल्ह्यातील माडेड पोलीस स्टेशन परिसरात सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत दोन महिलांसह पाच माओवादी ठार झाले होते. गेल्या वर्षी सुरक्षा दलांनी राज्यात वेगवेगळ्या चकमकीत 219 नक्षलवाद्यांना ठार केले होते.

दरम्यान, महत्त्वाचं म्हणजे, 6 जानेवारी रोजी नक्षलवाद्यांनी विजापूरमध्ये आयईडीने पोलिसांचे एक वाहन उडवले होते. या हल्ल्यात 8 पोलीस शहीद झाले होते. विजापूरमध्येच आणखी एका घटनेत नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात दोन जवान जखमी झाले. सीआरपीएफ 229 आणि कोब्रा यांचे संयुक्त पथक कॅम्प पुटकेल येथून क्षेत्राच्या वर्चस्वासाठी निघाले होते. तेव्हा माओवाद्यांनी पेरलेल्या प्रेशर आयईडीच्या स्फोटामुळे दोन सैनिक जखमी झाले. दरम्यान आता जखमी जवानांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Saif Ali Khan : पाठीतून पाणी लीक झालं, जखमेमुळे पॅरालाईजचा धोका, सैफवर 6 तास शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी धडकी भरवणारी माहिती सांगितली!