कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा शिरच्छेद करा, आणि 11 लाख रुपये मिळवा, अशी खुली ऑफर भाजपच्या एका नेत्याने दिली आहे. भाजपच्या युवा मोर्चाचे नेते योगेश वर्षणे यांनी ही घोषणा केली आहे.

हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी बॅनर्जींनी कोलकात्यापासून 180 किमी असलेल्या बिरभूममध्ये रॅली घेतली होती. यावेळी पोलिसांनी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांना दंडुक्यांनी मारहाण केल्याचा आरोप वर्षणे यांनी केला आहे.

वर्षणेंनी ममता बॅनर्जी यांच्या तुलना थेट दानवाशी केली आहे. 'मी सामान्य नागरिकांना होणाऱ्या मारहाणीचा व्हिडिओ पाहिला, तेव्हा एकच विचार मनात डोकावला. जर कोणी माझ्यासमोर ममता बॅनर्जींचं मुंडकं आणून ठेवलं, तर मी त्याला 11 लाख रुपये देईन' असं वर्षणे म्हणाले.

सभेत 'जय श्री राम'चा गजर दुमदुमला, मात्र त्याचा संबंध कोणत्याही राजकीय पक्षाशी नाही, तर त्या भक्तांनी दिलेल्या घोषणा होत्या. बिरभूममध्ये पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली होती आणि जेव्हा मदरसा रोडवर रॅली निघाली, तेव्हा पोलिसांनी दंडुके मारले, असं वर्षणे म्हणाले.