नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्यासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठक होणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी एनडीएतील घटकपक्षांची बैठक पार पडली. बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांनी उपस्थित लावली होती.


घटकपक्षातील सर्व नेत्यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आणि काळ्या पैशाविरोधात ही निर्णायक लढाई असल्याचं सांगितलं. आधी नोटाबंदीचा विरोध करणाऱ्या शिवसेनेनं यूटर्न घेतल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी नोटाबंदीचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं म्हटलं. सरकारच्या या निर्णयाचा पुनर्विचार करणं शक्यच नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.

दुसरीकडे विरोधीपक्षांच्या नेत्यांनी देखील बैठकीच आयोजन केलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. येत्या अधिवेशात नोटाबंदीच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरणार असल्याची माहिती काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंनी दिली.