SC Judgements in Regional Language : सर्वोच्च न्यायालयाकडून आज प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2023) म्हणजे 26 जानेवारीला दहा प्रादेशिक भाषांमध्ये एक हजाराहून अधिक निकालांचे भाषांतर जारी केले जाणार आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी या निर्णयाचं कौतुक केलं आहे. सोबतच सुप्रीम कोर्टाच्या निकालांचं मराठी भाषेतही (Marathi) भाषांतर व्हावं अशी विनंती केली आहे. यासंदर्भात त्यांनी सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांना पत्र देखील लिहिलं आहे.
"मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छिते की 2011 पर्यंत अंदाजे 83 दशलक्ष मराठी भाषिक होते, यामुळे मराठी ही देशातील सर्वाधिक बोलल्या जाणार्या भाषेपैकी एक बनली आहे. न्याय खर्या अर्थाने सुलभ होण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने भाषिक असलेल्या भाषेला प्राधान्य देणं आवश्यक आहे. त्यामुळे मराठीत लवकरात लवकर निकाल उपलब्ध करुन दिले जातील याची खातरजमा करण्याच्या माझ्या विनंतीचा कृपया विचार करावा, असं प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रात लिहिलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) निर्णय हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करुन वेबसाईटवर अपलोड केले जातील अशी घोषणा सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड (CJI D Y Chandrachud) यांनी एका कार्यक्रमात केली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. आज प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2023) म्हणजे 26 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाकडून दहा प्रादेशिक भाषांमध्ये 1091 निकालाचे प्रकाशन केले जाणार आहेत.
'या' दहा भाषांमध्ये सुप्रीम कोर्टाचे निकाल
भाषांची व्याप्ती आणखी वाढवली जाईल, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी सांगितलं की, इतर महत्त्वाच्या आणि उदाहरण ठरतील अशा निकालाच्या अनुवादाचे काम वेगाने सुरु आहे. ते म्हणाले की, हिंदी व्यतिरिक्त, या निकालांचे तमीळ, गुजराती, ओरिया, आसामी, खासी, गारो, पंजाबी, नेपाळी आणि बंगाली यांसारख्या पूर्व आणि पूर्वोत्तर भाषांमध्ये देखील भाषांतर केले जात आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येतील अत्यंत जुन्या रामजन्मभूमी वादाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या भाषांतराचं कामही वेगाने सुरु आहे. अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या विशेष खंडपीठाच्या निर्णयाचे भाषांतरही मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याचं सूत्रांकडून समजतं.
इंग्रजीत असलेले सर्वोच्च न्यायालयाचे निकाल 99.9 टक्के लोकांना समजत नाहीत : सरन्यायाधीश
देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादित केले जातील, असं सांगितलं होतं. सरन्यायाधीशांच्या या घोषणेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वागत केले. तर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल इंग्रजीत आहेत आणि 99.9 टक्के लोकांना ते समजू शकत नाहीत, असं सरन्यायाधीश चंद्रचूड काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते.
निकालांचे भाषांतर करण्यासाठी समितीची स्थापना
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे भाषांतर करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची घोषणाही सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी केली होती. न्यायमूर्ती अभय ओका यांच्याकडे या समितीचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले होते की ही समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे हिंदी तसेच गुजराती, ओरिया आणि तमिळ भाषांमध्ये भाषांतर करण्याबाबत खातरजमा करेल. न्यायालयीन निकालाच्या भाषांतराचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.