अहमदाबाद : गुजरातमधील सोमनाथ महादेव मंदिरावर सोन्याची वृष्टी होत आहे. या सोमनाथ मंदिराला भक्ताने गेल्या तीन वर्षांत 100 किलो सोनं दान केलं आहे. देशातील पहिले ज्योर्तिंलिंग सोमनाथ महादेव मंदिराच्या गाभाऱ्याला सोन्याने मढवण्याच काम आज अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर पूर्ण झाले आहे.
सोमनाथ मंदिराच्या आतील भाग 40 किलो सोन्याने मढवण्यात आलं आहे. हजारो वर्षांपूर्वी सोमनाथ मंदिर सोन्याचे होते, असे म्हटले जाते. पण अनेकदा या लुटारुंनी सोने लुटल्यानं आता मंदिर केवळ दगडांचं राहिलं आहे.
सोमनाथ महादेव मंदिराची सुवर्णयुग शतक परत आले आहे, असे म्हटले तरी वावगं ठरु नये. मुंबईच्या एका भक्ताने सोमनाथ महादेव मंदिराला तीन वर्षांपूर्वी 100 किलो सोनं दान करण्याचा संकल्प केला होता. दोन वर्षांपूर्वी त्यांनी 60 किलो सोनं दानही केलं होतं. दिलीपभाई लखी असे या भक्ताचे नाव आहे.
या सोन्यातून मंदिराचा त्रिशूळ, गाभारा, डमरु, ध्वजादंड आणि कळस सोन्याने मढवण्यात आले. काही दिवसांपूर्वीच दिलीपभाई लखी यांनी 40 किलो सोनं सोमनाथ मंदिराला दान करुन त्यांचा 100 किलो सोन दान करण्याचा संकल्प पूर्ण केला.