नवी दिल्ली: कर्जबाजारी कंपनीकडून कर्जाची सक्तीनं वसुली करायची सोडून बँकाकडून खुल्या हातानं त्यांची कर्जमाफी होताना दिसत आहे. कारण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 10 बँकांनी 2017-18 या आर्थिक वर्षात 1 लाख कोटींचं कर्ज माफ केलं आहे.


मागील आर्थिक वर्षाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.  धक्कादायक बाब म्हणजे 2016-17 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2017-18 मध्ये या कर्जमाफीत म्हणजेच राईट ऑफ्समध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सेंट्रल बँकेच्या एका अहवालानुसार तर 2014 ते 2017 सप्टेंबर या राष्ट्रीय बँकांनी तब्बल 2 लाख 42 हजारांची कर्जमाफी देऊ केली आहे. त्यामुळे एकीकडे बँकेच्या अनुत्पादक भांडवलात म्हणजेच NPA मध्ये वाढ होत असताना, अनेक बड्या कंपन्यांची कर्ज माफ करण्याची वेळ बँकांवर आली आहे.

2017-18 या आर्थिक वर्षात स्टेट बँक ऑफ इंडियानं 40 हजार 196 कोटींचं कर्ज माफ केलं आहे. हीच रक्कम 2016-17 मध्ये 20 हजार 570 कोटी होती.

कोणाचं किती कर्ज?

भूषण स्टीलनं 56 हजार कोटींच्या कर्जापैकी केवळ 33 टक्के कर्जफेड केली आहे.

आता आर्थिक अडचणीत आणखी वाढ करायची नसेल तर अल्ट्रा टेक सिमेंट कंपनीकडून 60 टक्के तर बिनानी सिमेंट कंपनीकडून कर्जाच्या 90 टक्के रक्कम बँकेला परत मिळणं अपेक्षित आहे

तर एस्सर स्टिलकडून 49 हजार कोटींपैकी 38 हजार कोटी वसूल झाले आहेत.

लँक्रो इन्फ्राटेकच्या कर्जबुडवेपणामुळे तर तब्बल 45 हजार कोटींचा तोटा बँकिंग क्षेत्राला होतोय.

अलोक इंडस्ट्रिजनंही 30 हजार कोटींच्या कर्जापैकी केवळ 5 हजार कोटींच्याच कर्जाची परतफेड केली आहे

त्यामुळे कर्जबुडव्या कंपन्यामुळे बँकेला 1 लाख 20 हजार कोटींचा तोटा होऊ शकतो